रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयाच्या डीनना 'उबाठा' गटाचा घेराव

Jul 18, 2024 - 10:32
Jul 18, 2024 - 10:37
 0
रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयाच्या डीनना 'उबाठा' गटाचा घेराव

रत्नागिरी : जिल्ह्यात नव्याने झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयाकडे जिल्हा शासकीय रुग्णालय वर्ग करण्यात आल्यापासून या रुग्णालयाची पूर्णतः रया गेली असून, भुलीचे डॉक्टर नाहीत, शस्त्रक्रियांचा होणारा खोळंबा, रुग्णालयातील दुर्गंधी, एक्स-रे व सीटी स्कॅन मशिन असूनही नसल्यासारखी, रुग्णाचे होणारे हाल पाहून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रमुख डीनना घेराओ घातला व फैलावर घेतले. मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. 

जिल्हा शासकीय रुग्णालयातील आरोग्याचे तीन तेरा बाजले असून, सातत्याने तक्रारी वाढल्या आहेत. जिल्हा रुग्णालय सध्या नव्याने सुरू झालेल्या मेडिकल कॉलेजच्या डीनच्या ताभ्यात आहे; परंतु डीन यांचे लक्षच नसल्याच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाईक होत आहेत. रुग्णालयात ते बऱ्याच वेळा येतच नसल्याने भेटायचे कुणाला, असा प्रश्न नातेवाईकांना पडला आहे. 

रुग्णालयात भूलतज्ज्ञच नसल्याने सातत्याने शस्त्रक्रिया रखडत आहेत. त्याचप्रमाणे रिक्तपदांमुळे अनेक तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने रुग्णांना कोल्हापूर किंवा खासगी रुग्णालयांमध्ये हलवावे लागत आहे. 

केसपेपरसाठीही वृद्ध रुग्णांना पहिल्या माळ्यावर जावे लागत आहेत. एक्स रेसारखी सुविधा असूनही त्याच्या फिल्मची झेरॉक्स पेपरवर दिली जात आहे.

रुग्णाचे सीटी स्कॅन झाल्यावर त्याचीही फिल्म दिली जात नाही. सोनोग्राफीही काहीच रुग्णांची केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्यामुळे बुधवारी शिवसेना उद्धव वाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख प्रदीप ऊर्फ बंड्या साळवी, उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे, जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, उपशहरप्रमुख नितीन तळेकर, महिला शहराप्रमुख मनीषा बामणे, राजश्री लोटणकर, राजन शेटो, बिपिन शिवलकर यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिकांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता रामानंद यांना घेराओ घातला व वरील परिस्थितीबाबत जाब विचारला.

तक्रार निवारणासाठी कक्ष उभारणार
यावेळी रामानंद यांनी ऑपरेशन असलेल्या रुग्णांचे ऑपरेशन तत्काळ केली जाईल, वृद्ध लोकांसाठी केसपेपरचे टेबल खाली आणले जाईल, एक्स-रे फिल्मवर दिला जाईल, रुग्णास नातेवाईकांसाठी तक्रार निवारण कक्ष उभारण्यात येण्यासह नियमित सोनाग्राफी केली जाईल व जिल्हा रुग्णालयात डीन किंवा प्रतिनिधींचे कार्यालय करण्यात येईल. रुग्णालयातील टॉयलेट, बाथरूमची नियमित साफसफाई केली जाईल, असे आश्वासन शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 AM 18/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow