रत्नागिरी : ऑनलाईन पोर्टलवर तिलोरी कुणबीचा उल्लेख करण्याची मागणी

Jul 18, 2024 - 10:13
Jul 18, 2024 - 11:18
 0

रत्नागिरी : कोकणात रत्नागिरीसह रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात बहुसंख्येने तिल्लोरी-कुणबी असा उल्लेख असलेल्या कुणबी समाजाला ओबीसी यादीत समाविष्ट असताना सुद्धा समाजाचे मिळणारे आरक्षण संकटात सापडले आहे. शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर तिलोरी कुणबी पोटजात समावेश नसल्याने मोठी अडचण उभी आहे. त्यासाठी तिलोरी कुणबी या पोटजातीचा समावेश करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी समाजाच्यावतीने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांकडे करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे, डॉ. नीलिमा सरप (लखाडे) यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा प्रशासन व जात पडताळणी समिती यांच्यासमवेत आढावा बैठक झाली. त्या बैठकीनंतर या आयोगाच्या सदस्यांसोबत जिल्ह्यातील सर्व समाज संघटनांचे पदाधिकारी व समाजबांधवांनी भेट घेतली.

त्यावेळी कुणबी समाजोन्नती न्यासाचे अरविंद डाफळे, राज्य ओबीसी जनमोर्चांचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर, रत्नागिरी कुणबी समाजोन्नती संघ अध्यक्ष रामचंद्र गराटे, नवी मुंबईचे माजी महापौर अविनाश लाड, अॅड. सुजित झिमण, नंदकुमार मोहिते, सुरेश भायजे, शांताराम मालप, हरिश्चंद्र गीते, शांताराम खापरे, अॅड. संदीप ढवळ, अॅड. महेंद्र मांडवकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

कोकणातील तिल्लोरी ही कुणबी पोटजात आहे. १९९६ च्या राज्य अध्यादेशात ओचीसी यादीत तिल्लोरी कुणबी समाविष्ट आहे, पण मागील काळात येथील बहुसंख्येने असलेल्या ओबीसी दाखले मिळणे शासनस्तरावरून बंद झाल्याने समाजातील विद्यार्थ्यांसह सर्वांचाच गोंधळ उडाला आहे. कुणबी समाजाला कोकणात ८३ कुणबी- ओबीसींमध्ये दाखले मिळणे बंद झाले होते. याबाबत योग्य पुराव्यांसह मागासवर्गीय आयोग व येथील जिल्हा प्रशासन यांच्याशीही यापूर्वी अनेकदा पत्रव्यवहार झालेला आहे. आता रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांसमोर पुन्हा एकदा कैफियत मांडण्यात आली आहे.

ऑनलाईन अर्ज भरताना अडचण
मागासवर्ग आयोगासोबत, शासन पातळीवर चर्चा झाली, त्यात समाजाचे सर्व पुरावे, कागदपत्र देण्याची मागणी करण्यात आली होती. आज या समाजाला कुणबी, तिलोरी कुणबी प्रमाणपत्र मिळतेय. पण शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करताना त्यावर असलेल्या इतर मागासवर्गीयांच्या यादीत तिलोरी कुणबी या जातीचा समावेश नाही. त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरतेवेळी तिलोरी कुणबी समजाची मोठी अडचण होत असल्याची माहिती देण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 AM 18/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow