चिपळूण : सावर्डे येथे खचलेल्या कॉक्रिटीकरणाला खडीची मलमपट्टी

Jul 19, 2024 - 12:51
 0
चिपळूण : सावर्डे येथे खचलेल्या कॉक्रिटीकरणाला खडीची मलमपट्टी

सावर्डे : मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे येथे आगवेनजीक वहाळ फाटा येथे अंडरपासला जोडणारा रस्ता खचला होता. आता या खचलेल्या भागावर राष्ट्रीय महामार्ग विभागाने खडी टाकून मलमपट्टी केली आहे. सध्या चौपदरीकरण केलेल्या दोन्ही लेन वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत व सर्व्हिस रोडने महामार्गाची वाहतूक सोडण्यात आली आहे.

वहाळ फाटा येथे असलेला अंडरपासचा भराव पहिल्याच पावसात खचला व या ठिकाणच्या काँक्रीटला देखील तडे गेले. आता या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने खचलेल्या कॉक्रिटीकरणाच्या ठिकाणी  खडीकरण करण्यात आले आहे. मात्र सर्व्हिस रोड अत्यंत निकृष्ट असून तो खड्डेमय झाला आहे. या सर्व्हिस रोडवरून अवजड वाहने जात असल्याने अपघात होण्याचा धोका आहे.

त्यामुळे स्थानिक नागरिकांना सर्व्हिस रोडवरून जाणे धोकादायक बनले आहे. सावर्डे रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्यांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे. आगामी गणेशोत्सव व श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर तत्काळ सर्व्हिस रोडचे खड़े बुजवावेत आणि लवकरात लवकर महामार्गाच्या दोन्ही लेन वाहतुकीसाठी खुल्या कराव्यात, अशी मागणी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी केली आहे.

काँक्रिटीकरण न करता खडीची मलमपट्टी का?
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करताना अनेक ठिकाणी रस्ता खचून काँक्रीटला तडे गेले आहेत. ज्या ठिकाणी कॉंक्रीटला तडे जातात त्यावेळी त्या ठिकाणचे काँक्रीट काढून नव्याने काँक्रीट केले जाते. मात्र वहाळ फाटा येथील अंडरपासचा भराव खचल्यानंतर त्या ठिकाणी तडे गेलेले काँक्रीट काढण्यात आले; परंतु नव्याने काँक्रीट न करता खडीची मलमपट्टी कशी करण्यात येत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. याबाबत शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी अधिका-यांचे लक्ष वेधले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:19 PM 19/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow