रत्नागिरी : उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्हीची नजर - कुवारबाव ग्रामपंचायत

Jul 22, 2024 - 16:45
Jul 22, 2024 - 16:50
 0
रत्नागिरी : उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्हीची नजर - कुवारबाव ग्रामपंचायत

रत्नागिरी : कुवारबाव ग्रामपंचायतीने उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांना चाप लावण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. या कॅमेऱ्यात कैद होणाऱ्यावर कायदेशीर दंडात्मक कारवाई बरोबरच फौजदारी गुन्हे दाखल करू, असा इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे. तसे फलक कुवारबाव, साईनगर, रवींद्रनगर या भागात लावण्यात आले आहेत.

कुवारबाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पत्रकार कॉलनीजवळील नाल्यात, सुयोग सोसायटीकडे पाण्याच्या टाकीजवळ, आजूबाजूच्या अपार्टमेंटमधील परिसरातील रहिवासी, व्यापारी, दुकानदार मोठ्या प्रमाणात उघड्यावर कचरा फेकून देतात. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होत आहे. या भागात हिवताप, डेंगीसारख्या साथीचे प्रमाण वाढत आहे शिवाय टाकलेल्या कचऱ्याच्या ठिकाणी मोकाट गुरे आणि मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला आहे. नाल्यात टाकलेल्या कचऱ्यामुळे तिथून वाहणाऱ्या ओढ्याचे पाणी खालील भागात असलेल्या विहिरी आणि तलावामध्ये जाऊन पिण्याच्या पाण्याचे साठे प्रदूषित होत आहेत. त्यामुळे गॅस्ट्रोसारख्या आजारांचे प्रमाणही वाढत आहे. या भागातील उत्कर्ष नगर परिसरात उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठित रहिवासी आपल्या चारचाकी, दुचाकी वाहनातून येता-जाताना बेशिस्तपणे कचरा फेकतात, असा आरोप केला जातो. अशा सर्वच बेशिस्त नागरिकांना या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे शिस्त लागणार आहे. ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याबद्दल येथील जागरूक रहिवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कुवारबाव ग्रामपंचायतीचा घनकचरा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाने स्वातंत्र्यदिनी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी स्टरलाइट प्रकल्पाच्या जागेत रत्नागिरी शहरासह परिसरातील ग्रामपंचायतींसाठी ५ एकर जागेत घनकचरा प्रकल्प उभारण्याची घोषणा केली. त्यामुळे घनकचऱ्याचा प्रश्नही लवकरच सुटणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:10 PM 22/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow