रत्नागिरी : तेल कंपन्यांनी मत्स्य व्यवसाय संस्थांचे कमिशन रखडवले

Jul 23, 2024 - 11:05
Jul 23, 2024 - 13:58
 0
रत्नागिरी : तेल कंपन्यांनी मत्स्य व्यवसाय संस्थांचे कमिशन रखडवले

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात ज्या मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांचे पेट्रोल पंप आहेत, त्यांना गेल्या दोन वर्षात डिझेल खरेदीचे कमिशन मिळालेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील मत्स्य व्यवसाय संस्था चालवणे अवघड झाले आहे. या कमिशनमधून संस्थांच्या कर्मचारीवर्गाचा पगार, वीज बिलाचा खर्च भागवला जातो. मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांच्या उलाढालीनुसार तेल कंपन्यांकडून कमिशन दिले जाते. किरकोळ विक्री करणाऱ्या इतर पेट्रोल पंपधारकांना दोन ते अडीच रुपये कमिशन दिले जाते कमिशन न मिळाल्यास दि. १५ ऑगस्ट रोजी उपोषण केले जाणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात ८५ सहकारी संस्था असून त्यांच्या सभासदांची संख्या ४१,०४० इतकी आहे. यातील सुमारे ४७ सहकारी संस्था आपल्या सदस्य नौकांना डिझेल विक्री करतात या संस्थांमध्ये त्यांचा कर्मचारी वर्ग कार्यरत असतो. या कर्मचाऱ्यांना तेल कंपन्यांकडून मिळणाऱ्या कमिशनवर पगार दिले जातात. ज्या संस्थेची उलाढाल मोठी त्यानुसार १ रुपयापासून पुढे लीटरनिहाय कमिशन मिळते. गेल्या दोन वर्षांत संस्थांना हे कमिशनच मिळालेले नाही.

डिझेल खरेदीच्या कमिशनमधून संस्थेच्या उलाढालीनुसार प्रत्येकी १ लाख रुपये ते सव्वा लाख रुपये कमिशन मिळते. हा एक महत्त्वाचा नफा असून गेल्या दोन वर्षांपासून एकाही संस्थेला कमिशन मिळालेले नाही. राज्य मच्छीमार संघटनेच्या नेतृत्वाखाली इतर मच्छीमार संस्था पदाधिकाऱ्यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांची अनेकवेळा भेट घेऊन ही व्यथा मांडली; परंतु अजूनही काहीच उपयोग झालेला नाही, अशी खंत मच्छीमार संघटनांकडून व्यक्त करण्यात आली आहे. संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा मंत्र्यांची भेट घेण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर राहिलेले कमिशन न मिळाल्यास १५ ऑगस्ट रोजी उपोषण करण्याचेही नियोजन केले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:22 PM 23/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow