Kolhapur Rain Update : पंचगंगा नदी धोका पातळीपासून 10 इंच दूर

Jul 24, 2024 - 12:00
 0
Kolhapur Rain Update : पंचगंगा नदी धोका पातळीपासून 10 इंच दूर

कोल्हापूर : पंचगंगा नदीची पाण्याची पातळी इशारा पातळीवरून धोका पातळीकडे जाण्यास सुरुवात झाली आहे. आज सकाळी 11 वाजेपर्यंत 42 फूट 2 इंचांवर पोहोचली आहे. त्यामुळे पंचगंगा नदी धोक्याची पातळी गाठण्यासाठी केवळ 10 इंच पाणी कमी आहे.

मात्र, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याच आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील 81 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असला, धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाचे पाणी नदी पात्रामध्ये येत असून संथ गतीने पंचगंगा नदीची पाण्याची पातळी वाढत आहे.

राधानगरी धरण 92 टक्के भरले

सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असतानाच जिल्ह्यातील धरण देखील पूर्ण क्षमतेने भरू लागली आहेत. राधानगरी धरण सध्या 92 टक्के भरलं आहे. उद्या (25 जुलै) सकाळपर्यंत धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग होऊ शकतो. परिणामी पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होवून अडचण निर्माण होऊ शकते. सध्या पंचगंगा नदीची वाटचाल धोका पातळीकडे सुरू आहे. त्यात धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला तर कोल्हापूर जिल्ह्यावर महापुराचे संकट ओढवेल आणि परिस्थिती बिकट होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. पंचगगा नदीची पाणी पातळी 42 फूट 1 इच आहे, पंचगंगा नदीची धोका पातळी 43 फूट इतकी आहे.

दरम्यान, कोल्हापूर शहरातून शियेकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आल्याने मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. शिये गावाकडे जाताना आता महामार्गावरून जावं लागणार आहे. पुण्याकडून कोल्हापूरच्या दिशेने येताना शहरामध्ये प्रवेश करण्यासाठी देखील हा मार्ग वापरला जातो. मात्र, आता प्रवाशांना मुख्य प्रवेशद्वारातूनच कोल्हापूर शहरामध्ये प्रवेश करता येणार आहे.

कळंबा तलाव भरला

दरम्यान, कोल्हापूर शहरानजीक असलेला कळंबा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. कळंबातलाव हा ऐतिहासिक तलावातून याच तलावामधून कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा केला जात होता. आता हा तलाव आता शंभर टक्के भरला असून तलावाच्या सांडव्यामधून पाणी बाहेर पडत आहे. त्यामुळे एक प्रकारे धबधबा तयार झाला असून नागरिक कळंबा तलावाचा धबधबा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.

जिल्ह्यातील कोणते बंधारे पाण्याखाली?

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी

भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे, तारळे व शिरगांव

तुळशी नदीवरील- बीड, आरे व बाचणी

कासारी नदीवरील- यवलूज, ठाणे आळवे, पुनाळ तिरपण, बाजार भोगाव, पेंडाखळे, कांटे, करंजफेण, वालोली व कुंभेवाडी

कुंभी नदीवरील- शेणवडे, कळे, वेतवडे व मांडुकली, धामणी नदीवरील- सुळे, आंबर्डे, गवशी, गाटीवडे

वारणा नदीवरील -चिंचोली, माणंगाव, कोडोली, शिगांव, खोची, तांदूळवाडी व दानोळी

कडवी नदीवरील- भोसलेवाडी, कोपार्डे, शिगांव, सवतेवाडी व सरुडपाटणे

शाळी नदीवरील- येळाणे

दुधगंगा नदीवरील- सिध्दनेर्ली, सुळकूड, बाचणी व दत्तवाड

वेदगंगा नदीवरील- निळपण, वाघापूर, गारेगोटी, म्हसवे, कुरणी, बस्तवडे, शेणगांव व चिखली

हिरण्यकेशी नदीवरील - साळगांव, ऐनापूर, निलजी,गिजवणे व जरळी

घटप्रभा नदीवरील- कानडेसावर्डे, पिळणी, बिजूरभोगोली, हिंडगांव, तारेवाडी, कानडेवाडी व आडकूर

ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड व हल्लारवाडी, न्हावेली, उमगाव, कोकरे, कोवाड, माणगाव, ढोलगरवाडी व जंगमहट्टी असे एकूण 81 बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा

राधानगरी 7.71 टीएमसी, तुळशी 2.76 टीएमसी, वारणा 29.28 टीएमसी, दूधगंगा 17.67 टीएमसी, कासारी 2.04 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी 1.93 टीएमसी, पाटगाव 3.32 टीएमसी, चिकोत्रा 0.97 टीएमसी, चित्री 1.89 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, आंबेआहोळ 1.24 टीएमसी, सर्फनाला 0.48 टीएमसी व कोदे लघु प्रकल्प 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 24-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow