गणपतीपुळे रिसॉर्ट उत्पन्नामध्ये महाराष्ट्रात अव्वल

Jul 24, 2024 - 12:39
Jul 24, 2024 - 12:42
 0
गणपतीपुळे रिसॉर्ट उत्पन्नामध्ये महाराष्ट्रात अव्वल

रत्नागिरी : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे गणपतीपुळे रिसॉर्ट उत्पन्नामध्ये महाष्ट्रात अव्वल ठरले आहे. गतवर्षी या रिसॉर्टच्या ८० सूटमधून (खोल्या) ४ कोटी ६३ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. गणपतीपुळेसह वेळणेश्वर, सिंधुदुर्गमधील कुणकेश्वर, वारकर्ली, रायगडमधील हरिहरेश्वर रिसॉर्ट मिळून कोकणातून ६ कोटी ५३ लाखांचे उत्पन्न मिळाले असून हे देखील राज्यात अव्वल आहे. पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी दीपक माने यांनी ही माहिती दिली.

कोकणातील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ प्रयत्नशील आहे. देशी, विदेशी, राज्यासह स्थानिक पर्यटनाकांना दर्जेदार सेवा मिळावी यासाठी कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यामध्ये आलिशान रिसॉर्ट, हॉटेल आदी आहेत. या रिसॉर्टच्या माध्यमातून येणाऱ्या पर्यटकांना अतिथी देवो भवं म्हणत त्यांना उत्तम सेवा दिली जाते. रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील एमटीडीसीचे मोठे रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टमध्ये ११० सूट आहेत. त्यापैकी ३० सूट दुरुस्तीसाठी काढण्यात आले असून, उर्वरित ८० सूटच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात येणाऱ्या पर्यटकांना उत्तम सेवा दिली. गणपतीपुळे हे जगाच्या नकाशावर आलेले तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे या तीर्थक्षेत्राला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्यादेखील मोठी आहे. पर्यटकांना दिलेल्या सेवेतून पर्यटन विकास महामंडळाला गेल्या वर्षी ४ कोटी ६३ लाखांचे उत्पन्न मिळाले. राज्यात एमटीडीसीच्या एकूण रिसॉर्टमध्ये गणपतीपुळे हे रिसॉर्ट उत्पन्नामध्ये राज्यात नंबर १ ठरले आहे.

गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथे एमटीडीसीचे रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टमध्ये राहिलेल्या पर्यटकांनी रिसॉर्टमधील सेवासुविधांबाबत सर्वाधिक चांगली मते व्यक्त केली. यातून ३१ लाख ७२ हजाराचे उत्पत्र मिळाले. रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर एमटीडीसी रिसॉर्टलाही ५६ लाख १ हजार चांगले उत्पन्न मिळाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर रिसॉर्टमधून २६ लाख २१ हजार तर तारकर्लीमधून ७७ लाख ५६ हजार उत्पन्न मिळाले. एकूण कोकणचा आढावा घेतला तर एमटीडीसीच्या रिसॉर्टमधून ६ कोटी ५३ लाखाचे उत्पन्न मिळाले आहे.

जलक्रीडांची सुविधा
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने गणपतीपुळे येथे विविध सुविधा निर्माण केल्या आहेत. त्याचप्रमाणे बोट क्लबसारख्या जलक्रीडा सुरू केल्या आहेत. "वेडिंग- बर्थडे डेस्टिनेशन" म्हणूनही गणपतीपुळेत नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी एमटीडीसी प्रयत्नशील आहे.

रिसॉर्टनिहाय उत्पन्न
गणपतीपुळे ४ कोटी ६३ लाख
वेळणेश्वर ३१ लाख ७२ हजार
हरिहरेश्वर ५६ लाख ०१ हजार
कुणकेश्वर २६ लाख २१ हजार
तारकर्ली ७७ लाख ५६ हजार

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:06 PM 24/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow