करूळ घाटात डोंगर कोसळला; वैभववाडी-कोल्हापूर वाहतूक पुन्हा ठप्प

Jul 24, 2024 - 14:51
 0
करूळ घाटात डोंगर कोसळला; वैभववाडी-कोल्हापूर वाहतूक पुन्हा ठप्प

वैभववाडी : पावसाचा जोर सोमवारपासून कमी झाला असला तरी अजूनही पडझडीचे प्रकार सुरूच आहेत. तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर गगनबावडा-कोल्हापूर किरवे ते लोंघे रस्त्यावर पुराचे पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे, तर वाहतूक बंद असलेल्या करूळ घाटात या आठवड्यात दुसऱ्यांदा डोंगर रस्त्यावर कोसळला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा सोमवारपासून (ता.२२) जोर ओसरला आहे. मात्र वादळीवाऱ्यांसह अधुनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. सोमवारी सायंकाळी तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर मांडकुली, खोकुर्ले येथील पाणी ओसरल्याने वाहतूक सुरू करण्यात आली होती. परंतु कोल्हापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे किरवे ते लोंघेदरम्यान पुन्हा रस्त्यावर पाणी आले आहे. त्यामुळे हा मार्ग पुन्हा वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक फोंडा घाटमार्गे वळविण्यात आली आहे.

पावसाचा जोर जरी कमी झाला असला तरी अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे पडझडीचे प्रकार सुरूच आहेत. वैभववाडी-गगनबावडा दरम्यान करूळ घाटात मंगळवारी (ता.२३) सायंकाळी पुन्हा डोंगर कोसळला. दगड, माती आणि झाडांच्या भरावाने ६० ते ७० मीटरचा रस्ता व्यापला आहे. परंतु सध्या हा घाटरस्ता वाहतुकीस बंद असल्यामुळे या पडझडीचा परिणाम जाणवला नाही. सतत कोसळणाऱ्या डोंगरांमुळे नव्याने बांधलेल्या रस्त्याचे मोठे नुकसान होत आहे.

पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडत आहेत. काही भागांत वादळीवाऱ्यांसह सरी पडत आहेत. त्यामुळे काही मार्गांवर झाडे उन्मळून पडणे, वीजवाहिन्या तुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नावळे येथे संभाजी रावराणे यांच्या गोठ्यावर झाड पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:20 24-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow