Lavasa Landslide: लवासामध्ये दरड कोसळली, २ बंगले मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले

Jul 25, 2024 - 12:44
 0
Lavasa Landslide: लवासामध्ये दरड कोसळली, २ बंगले मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले

पुणे : मुळशी तालुक्यात असलेल्या लवासामध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. लवासामध्ये असलेल्या दोन व्हिलांवर दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाल्याने हे दोन्ही व्हिला गाडले गेले आहेत. या व्हिलांमध्ये तीन ते चार लोक राहत असल्याची माहिती देखील समोर येत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी माहिती दिली आहे. या संदर्भातील व्हिडिओ देखील समोर आला आहे.

दोन व्हिलांवर दरड कोसळली

दोन दिवसांपासून पुणे आणि परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यात आज सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. त्यातच लवासामध्ये दरड कोसळल्याने काही लोक बेपत्ता असल्याचे देखील समोर येत आहे. बचाव पथकाकडून अद्याप कोणतेही पाऊले उचलले गेले नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
व्हिलामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरु

स्थानिक नागरिकांकडून या व्हिलांमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मुळशी तालुक्याच्या गाठ परिसरामध्ये अनेक नागरिक पर्यटनासाठी देखील येत आहेत. मात्र, या भागात पावसाचा जोर वाढल्याने सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध लवासा सिटी परिसरात अनेक पर्यटक पर्यटनासाठी येतात. मात्र, ही घटना घडल्याने घराच्या बाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
ताम्हिणी घाटातही दरड कोसळली, एकाचा मृत्यू

पुण्यात मुसळधार पाऊस सुरु असून शहरात बऱ्याच भागात पाणी भरलं आहे. पुण्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुण्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मावळ आणि मुळशी तालुक्यातही पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पावसामुळे ताम्हिणी घाट परिसरातील आदरवाडी गाव परिसरात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

पहाटेच्या सुमारास डोंगराचा मातीचा काही भाग तुटून रस्त्यावर आला. जवळपास १० ते १२ फूट उंचीचा मातीचा हा थर रस्त्यावर येऊन पडला. या परिसरातील एका हॉटेलच्या भागांत हा कडा कोसळला. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती आहे आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:05 25-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow