रत्नागिरी : रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत भाजप, उबाठा रनप वर धडकले

Jul 25, 2024 - 15:16
Jul 26, 2024 - 10:00
 0
रत्नागिरी : रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत भाजप, उबाठा रनप वर धडकले

रत्नागिरी : मागील सुमारे वीस वर्षांपासून रत्नागिरीकरांच्या कुंडलीत अढळ स्थानावर बसून त्रास देणारा प्रश्न म्हणजे रस्त्याची दुरावस्था. आंदोलने करण्याऱ्या प्रत्येक पक्षाने नगरपालिकेची सत्ता उपभोगली मात्र या त्रासातून सुटका करण्यास प्रत्येक सत्ताधारी कमी पडला आहे. आता सत्तेतून पायउतार झाल्यावर हेच पक्ष आता आंदोलने करताना दिसत आहेत. किमान या आंदोलनाच्या माध्यमातून तरी या प्रश्नाचे समूळ उच्चाटन व्हावे अशी अपेक्षा रत्नागिरीतील सर्वसामान्य नागरिक करीत आहे.

आज रत्नागिरी शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून व राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजप करुन शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत आंदोलने करण्यात आली. शहरातील आठवडा बाजार येथे भाजप कडून रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण देखील करण्यात आले. त्यानंतर प्रथम उबाठा गट आणि त्यानंतर काही वेळाने भाजप कार्यकर्ते मोर्चा काढत नगरपालिकेवर धडकले. 

याठिकाणी माजी आमदार बाळासाहेब माने देखील बीजेपीच्या या मोर्चात सहभागी झाले. २०१४ रोजी सुमारे २५ वर्षे असणाऱ्या शिवसेना भाजप युतीचा काडीमोड झाला होता. मात्र आजदेखील पहिल्या प्रेयसीवर असणाऱ्या प्रेमासारखे या दोघांमधील प्रेम कधीतरी दिसून येते. आजदेखील भाजप शिवसेना मोर्चाच्या निमित्ताने नगरपालिकेत एकत्र आल्यावर ते पाहायला मिळाले. यानंतर दोन्ही पक्षांनी आपापल्या परीने मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरले. सत्तेत असणाऱ्या भाजप ला देखील आज रत्नागिरी शहरातील रस्त्यांसाठी आंदोलन करावे लागते ही दुर्दैवाची गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया उबाठा तालुकाध्यक्ष बंड्या साळवी यांनी दिली. रत्नागिरीच्या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आपण आंदोलन केलेत असेच आंदोलन मागील १७ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाबाबत कधी करणार हा अडचणीचा प्रश्न रत्नागिरी खबरदार ने विचारताच हे प्रश्न आम्हाला विचारू नका अशी ओरड बीजेपीच्या काही कार्यकर्त्यांनी केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण या कामावर लक्ष ठेऊन असून ते सक्षम आहेत असे उत्तर माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या प्रश्नावर दिले.

एकंदर आज दोन पक्षांनी केलेल्या आंदोलनाची चर्चा एका बाजूला सुरु होती. तर दुसरीकडे पेव्हर च्या माध्यमातून खड्डे भरण्याचे काम नगरपालिकेने सुरू केले होते.

 

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:43 25-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow