कोयनेचे पाणी चिपळूणला येते ही अफवाच !

Jul 26, 2024 - 11:58
Jul 26, 2024 - 17:00
 0
कोयनेचे पाणी चिपळूणला येते ही अफवाच !

चिपळूण : कोयना धरणात पाण्याची आवक वाढल्यानंतर धरणाच्या सांडव्यावरून काळपासून पाणी सोडण्यास सुरवात झाली. चिपळूणमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाने दिलेल्या सूचना फिरवल्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते; मात्र सायंकाळी उशिरापर्यंत वाशिष्ठीच्या पाण्याची पातळी वाढली नाही. त्यामुळे कोयनेचे पाणी चिपळूणला येते ही शक्यता केवळ अफवाच ठरली.

कोयना पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरण भरत आले आहे. पश्चिमेकडे वीजनिर्मितीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर चिपळूणच्या प्रांताधिकाऱ्यांनी मर्यादा घातली आहे. अरबी समुद्राची भरती-ओहोटी आणि येथे होणाऱ्या पावसाचा अंदाज घेऊन कोयना प्रकल्पातून वीजनिर्मिती केली जात आहे. त्यामुळे कोयना धरणातून पश्चिमेकडे म्हणजेच अलोरे, कोळकेवाडी, पोफळीकडे येणाऱ्या पाण्यावर मर्यादा आहे. काळ सकाळी ८ वा. धरणातील पाणीसाठा ७५.२६ टीएमसीइतका झाला होता. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी सायंकाळी ४ वा. धरणाचे दरवाजे १ फूट ६ इंच उचलून सांडव्यावरून १० हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

कोणत्याही धरणाच्या सांडव्यावरून पाणी सोडण्यापूर्वी संबंधित खात्याकडून प्रशासनाला आणि नदीकाठच्या रहिवाशांना २४ तास अगोदर माहिती दिली जाते. त्या पद्धतीने कोयना धरण व्यवस्थापन विभागाने सातारा जिल्हा प्रशासन आणि नदीकाठी राहणाऱ्या लोकांना बुधवारी या संदर्भातील सूचना केली होती. या संदर्भातील संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून चिपळुणात ही काही लोकांना मिळाले. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हे मेसेज सर्वत्र फिरवले गेले. त्यामुळे चिपळूण शहर आणि वाशिष्ठी नदीच्या काठावर राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. येथील नागरिकांनी कोयना प्रकल्पात काम करणाऱ्या स्थानिक कर्मचारी, अधिकारी आणि प्रशासनाशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. काहींनी पोफळी येथील महानिर्मिती कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला कोयनेचे पाणी खरंच चिपळूणकडे येणार आहे का? ते किती प्रमाणात येईल? या संदर्भात चौकशी सुरू झाली. कोयनेचे पाणी आपल्याकडे येत नाही ते सांगली, सातारा, कोल्हापूरकडे जाते, असे प्रत्येकाला सांगण्यासाठी जलसंपदा आणि महानिर्मितीच्या अधिकारी व कर्मचान्यांना आपला वेळ घालवावा लागला. सह्याद्रीच्या खोऱ्यात आणि चिपळूण परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे वाशिष्ठी नदी तुडुंब भरून वाहत आहे. नदीतील पाणीपातळी कमी-जास्त होत होती; परंतु त्यात मोठा फरक पडला नाही. त्यामुळे कोयनेचे पाणी चिपळुणात येते ही केवळ अफवा असत्याची खात्री पटली नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.

कोयना धरणाच्या सांडव्यावरून सोडण्यात येणारे पाणी चिपळूणकडे येत नाही. ते कृष्णा नदीतून पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने जाते. कोळकेवाडी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावरही आता नियंत्रण आहे. त्यामुळे चिपळूणमधील लोकांनी विनाकारण भीती बाळगू नये.- दीपक गायकवाड, उपअभियंता कोळकेवाडी धरण व्यवस्थापन विभाग अलोरे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:11 PM 26/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow