रत्नागिरी जिल्ह्याला अती जोरदार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट'

Jul 27, 2024 - 10:16
Jul 27, 2024 - 10:22
 0
रत्नागिरी जिल्ह्याला अती जोरदार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट'

रत्नागिरी: गुरुवारी दिवसभर आणि सकाळपासून पावसाचा जोर ओसरलेला होता. काही भागात उघडीप तर काही भागात हलके सातत्य होते. मात्र, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा चक्रीय वाऱ्याच्या साथीने सक्रीय असल्याने शनिवार आणि रविवारी रत्नागिरी जिल्ह्यासह रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे रत्नागिरी आणि सिधदुर्ग जिल्ह्यात अती जोरदार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' जारी कायम आहे.

दरम्यान, गुरूवारी सकाळी ८ ते शुक्रवारी सकाळी ८ या संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात १०० मि.मी.च्या सरासरीने सुमारे ९०० मि. मी. पाऊस झाला. गुहागर आणि राजापूर या दोन तालुक्याच अपवाद वगळता अन्य सात तालुक्यात पावसाने रात्रभरात १०० मि. मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. या मध्ये मंडणगड तालुक्यात ९९.८०, दापोली १०७.५०, खेड १०८.८०, गुहागर तालुक्यात सर्वात कमी ५४.५०, चिपळूण १०१.४०, संगमेश्वर ११०.९०, रत्नागिरीत तालुक्यात सर्वाधिक १२३, लांजा ११३.७० आणि राजापूर तालुक्यात ६९.७० मि.मी. पावसाची नोंद झाली. 

बुधवारी दिवसभर आणि गुरूवारच्या गेल्या रात्री पावसाने धुमाकुळ घाताला होता. पावसात जोरदार सातत्य असल्याने जिल्ह्यातील प्रमुख नद्यांतील जलस्तर चौध्यांदा वाढून जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण केली. त्यापैकी तीन नद्या जिल्हा आपत्ती विभागाच्या दुपारी १२ वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार इशारा पातळीवरून वाहात होत्या. यामध्ये खेडची जगबुडी इशारा पातळीपासून १.३० मिटर उंचीवरुन वाहात होती. 

गुरूवारी याचवेळी जगबुडीने धोका पातळी वरुन वाहात होती. संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदीनेही इशारा पातळी गाठली होती. तर राजापूर तालुक्यातील कोदवली नदीनही इशारा पातळी ओलांडताना १.३० मिटरने जलस्तर वाढला होता. अन्य नद्यांपैकी लांजा रत्नागिरी अशी वाहणारी काजळी नदीनेही जवळपास इशारा पातळी गाठली होती. मात्र, जलस्तर नियंत्रणात होता.

चिपळूणच्या वाशिष्ठी आणि संगमेश्वर तालुक्यातील सोनवी आणि बावनदीचा जलस्तरही पूरसदृश स्थिती निर्माण करण्याच्या स्थितीत वाढला होता. मात्र, दरम्यानच्या काळात पावसाने उसंत घेतल्याने येथील पूरस्थितीत ओसरण्यास मदत झाली. मुसळधार पावसाचे संकेत लक्षात घेऊन प्रशसानाने शुक्रवारी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती. जोरदार पाऊस झाल्याने गुरूवारी रात्री अनेक भागात झाडे उन्मळून वीज वाहिन्या तुटल्याने वीज प्रवाह खंडित झाला.

या कारणाने संगमेश्वर तालुक्यात शंभराहून अधिक गावे अंधरात होती. राजापूर तालुक्यात गुरूवारी रात्री पडलेल्या पावसामुळे अर्जुना नदीने इशारा पातळी ओलांडली त्यामुळे राजापूर शहरात पूरस्थिती उद्भवली. शुक्रवारी बाजारपेठ आणि जवाहर चौकाला पाण्याचा वेढा होता. मात्र, पाऊस कमी झाल्याने तेथील स्थितीत सुधारणा झाली.

गुरुवारी पावसाने तुफान हजेरी लावली. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. पुढील दोन दिवस वीकेंडला कोकणातील रत्नागिरी व रायगड मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. समुद्र सपाटीवरील कमी दाबाचा पट्टा किनारपट्टी भागात सक्रीय आहे. यामुळे कोकण आणि गोव्यामध्ये पुढील पाच ते सात दिवस तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भामध्ये पुढील दोन दिवस बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागो वर्तविली आहे.

पाणी टंचाईच्या खेड तालुक्यात सर्वाधिक पाऊस
रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस हा पाणीटंचाई भेडसावणाऱ्या खेड तालुक्यात झाला आहे. अडीच हजार मि.मी. पेक्षा जास्त पाऊस खेड तालुक्यात आतापर्यंत झाला आहे. त्यामुळे चारवेळा जगबुडी नदीचा जलस्तर इशारा पातळीपेक्षा वाढला, तर सर्वात कमी पाऊस गुहागर तालुक्यात नोंदविला आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 27/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow