राजापूर : धरण प्रकल्पातून सिंचन वाढीचा उद्देश अपूर्ण : दीपक नागले

Jul 18, 2024 - 11:03
Jul 18, 2024 - 16:09
 0
राजापूर : धरण प्रकल्पातून सिंचन वाढीचा उद्देश अपूर्ण : दीपक नागले

राजापूर : सिंचन वाढवण्याच्या दृष्टीने तालुक्यामध्ये गेल्या २० वर्षामध्ये सुमारे एकवीसहून अधिक छोट्या-मोठ्या धरण प्रकल्पांची उभारणी करण्यात येत आहे. आजपर्यंत कोट्यवधी रुपयांचा शासननिधीही खर्च करण्यात आला. कालव्याची कामे पूर्ण होण्यापूर्वी काही धरणांना गळती लागली आहे. काहींमध्ये मोठ्या प्रमाणात गाळाचा संचय झाला आहे. त्यामुळे ज्या उद्देशाने या धरणांची उभारणी झाली आहे तो उद्देश खरोखरच सफल होतो आहे का, हा संशोधनाचा विषय बनलेला असताना या सर्व धरणांच्या कामांच्या माहितीसाठी स्वतंत्र आढावा बैठक व्हावी, अशी मागणी जिल्हा नियोजन समिती सदस्य दीपक नागले यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नागले यांनी धरणांची आढावा बैठक घेण्याची मागणी केली असून, पालकमंत्री सामंत यांनी त्या अनुषंगाने लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याचे नागले यांनी सांगितले.

सिंचन क्षमता वाढवण्याच्यादृष्टीने तालुक्यामध्ये गेल्या २० वर्षामध्ये काजिर्डा, अर्जुना मध्यम प्रकल्प, जामदा, चिंचवाडी धरण (पांगरे), चव्हाणवाडी (ताम्हाणे), काकयेवाडी, वाटूळ, कोंडवाडी (कळसवली), वाळवड (मूर), ओझर, तळवडे, झर्ये, पाचल, परूळे, सौंदळ बारेवाडी, कोंड्ये, जुवाठी, कशेळी, गोपाळवाडी, शीळ, चिखलगाव अशा २१ हून अधिक छोट्या-मोठ्या धरण प्रकल्पांची उभारणी करण्यात येत आहे. त्यावर आजपर्यंत कोट्यवधीचा निधी खर्च झाला आहे. ११ प्रकल्पांचे बांधकाम पूर्ण होऊन त्यामध्ये पाणीसाठा झाला आहे. दहाहून अधिक धरण प्रकल्पांचे बांधकाम सुरू आहे. अनेक धरणे बांधून पूर्ण झाली असली तरी कालव्यांअभावी धरणातील पाणी उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी धरणाला गळती लागली असून, धरणे गाळाने भरल्याचे चित्र आहे. त्यामुळे धरणे उभारणीचा उद्देश सफल झालेला नाही. त्यामुळे या सर्व धरणांच्या कामांचा स्वतंत्र बैठकीद्वारे आढावा घेण्याची मागणी केली होती.

जनजीवन मिशनचाही बोजवारा
जलजीवन मिशन योजनेच्या कामाचाही तालुक्यामध्ये बोजवारा उडाला आहे. सुमारे ११० कोटी रुपये निधीची तरतूद असलेल्या १९८ नळपाणी योजना तालुक्यामध्ये मंजूर आहेत. ही कामे मे अखेरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असताना त्यापैकी केवळ ४६ नळपाणी योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच जलजीवन मिशन योजनेची आढावा बैठक होणार असल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख दीपक नागले यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:31 PM 18/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow