रत्नागिरीत होणार दीड हजार कोटीचा पल्प, रस प्रकल्प

Jul 31, 2024 - 10:11
 0
रत्नागिरीत होणार दीड हजार कोटीचा पल्प, रस प्रकल्प

मुंबई : राज्यात ८१ हजार १३७ कोटी रुपये गुंतवणुकीच्या विशाल आणि अतिविशाल अशा सात प्रकल्पांना मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीत मंजुरी देण्यात आली. यामध्ये हिंदुस्थान कोकाकोला बेव्हरेजमार्फत फळांचा पल्प आणि रस यावर आधारित उत्पादननिर्मितीचा विशाल प्रकल्प रत्नागिरी येथे होणार आहे. 

यासाठी १ हजार ५०० कोटींची गुंतवणूक होणार आहे. तसेच उच्च तंत्रज्ञानावर आधारित लिथियम बॅटरी, इलेक्ट्रिल व्हेईकल, सेमीकंडक्टर चिप, फळांचा पल्पनिर्मिती प्रकल्पांचा समावेश आहे. हे प्रकल्प कोकणसह मराठवाडा, विदर्भ या भागात येत असल्याने तेथे २० हजार जणांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री उदय सामंत, मुख्य सचिव सुजाता सौनिक, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यात उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी औद्योगिक धोरणानुसार सामूहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत विविध प्रोत्साहने जाहीर करण्यात आलेली आहेत. राज्यात गुंतवणुकीला पोषक वातावरण असल्याने गुंतवणूकदार राज्याला पसंती देत आहेत. झालेल्या करारानुसार जेएसडब्ल्यू एनर्जी पीएसपी इलेव्हन लि., यांचा लिथियम बॅटरीनिर्मितीचा अतिविशाल प्रकल्प नागपूर भागात होणार आहे. प्रकल्पामध्ये एकूण २५ हजार कोटी एवढी गुंतवणूक होणार आहे. त्यातून ५ हजारपेक्षा अधिक रोजगारनिर्मिती होणार आहे. जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलिटी लि. कंपनी इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहननिर्मितीचा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणारा राज्यातील पहिलाच अतिविशाल प्रकल्प हा छत्रपती संभाजीनगर येथे उभारणार आहे. या प्रकल्पामध्ये एकूण २७ हजार २०० कोटी एवढी गुंतवणूक होणार असून, ५ हजार २०० पेक्षा अधिक रोजगारनिर्मिती होईल. या प्रकल्पामध्ये वार्षिक ५ लाख इलेक्ट्रिक प्रवासी कार व १ लाख व्यावसायिक कारनिर्मितीचे नियोजन आहे.

अन्य प्रकल्प
आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीमार्फत सेमीकंडक्टर चिपनिर्मितीचा एकात्मिक प्रकल्प तळोजा किंवा पुणे अथवा उर्वरित महाराष्ट्रामध्ये उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्रातला हा पहिलाच सेमीकंडक्टरनिर्मिती करणारा प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये प्रथम टप्प्यात रुपये १२ हजार कोटी एवढी गुंतवणूक होणार आहे, तर २ हजारांपेक्षा जास्त रोजगारनिर्मिती होणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये एवढीच गुंतवणूक होणार आहे.

आवाडा इलेक्ट्रो कंपनीचा सोलर पी. व्ही. मॉड्युल्स आणि इलेक्ट्रोलायझरचा एकात्मिक प्रकल्प अतिरिक्त नागपूर येथील बुटीबोरी एमआयडीसीत आणि पनवेल येथील भोकरपाडा या परिसरात उभारण्यात येणार आहे. कंपनीमार्फत नवीकरणीय ऊर्जास्रोताचा उच्च तंत्रज्ञानावर आधारित राज्यात प्रकल्प स्थापित होणार आहे. या प्रकल्पामध्ये एकूण १३ हजार ६४७ कोटी एवढी गुंतवणूक होणार असून, याद्वारे ८ हजारांपेक्षा अधिक रोजगारनिर्मिती होणार आहे.

परनॉर्ड रिकार्ड इंडिया प्रा. लिमिटेडमार्फत मद्यार्कनिर्मितीचा विशाल प्रकल्प अतिरिक्त बुटीबोरी एमआयडीसीत स्थापन करण्याचे नियोजित आहे. या प्रकल्पामध्ये १ हजार ७८५ कोटी एवढी गुंतवणूक होणार आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 31/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow