पारंपरिक पद्धतीने गौरीपूजन उत्साहात

Sep 12, 2024 - 09:45
 0
पारंपरिक पद्धतीने गौरीपूजन उत्साहात

◼️ नवविवाहितांचा ओवसा साजरा
 

रत्नागिरी : जिल्ह्यात बुधवारी रिमझिम पावसाच्या सरींमध्ये सर्वत्र गौरीपूजन पारंपरिक पद्धतीने उत्साहात झाले. दुपारी साडी-चोळी व दागदागिन्यांनी सजवलेल्या गौरीला पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवण्यात आला. काही ठिकाणी मांस-मटणाचा नैवेद्य दाखवण्यात आला. नवविवाहितांनी गौरीचा ओवसा काढला.

गौरी म्हणजे गणेशाची माता पार्वती. मंगळवारी तिला आवाहन करून आज विधीवत पूजन करण्यात आले. गौर सजवणे हा महिलांच्या आवडीचा विषय. कोकणात अनेक ठिकाणी लाकडी व धातूचे मुखवटे असणाऱ्‍या उभ्या गौरी असतात. या गौरींना साडी-चोळी नेसवून, मुकुट, नथ, बांगड्या, मंगळसूत्र, माळा, कंबरपट्टा अशा दागिन्यांनी सजवण्यात आले. गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी जिल्ह्यात आले आहेत. गेल्या पाच दिवसांत उत्सवामध्ये आरत्या, भजने, पारंपरिक लोकनृत्य जाखडी, नाच यांनी रंग भरला आहे. गणरायांच्या पाठोपाठ ज्येष्ठागौर व कनिष्ठा गौर प्रत्येक घरात मोठ्या उत्साहात आल्या.

नवविवाहितांनी ओवसा प्रथम घरच्या देवाला विडा ठेवला. त्यानंतर नवरदेवांना मान व नंतर घरातील ज्येष्ठांना विडे देऊन वाडीतील ठरलेल्या घरांमध्ये विडे दिले. त्यानंतर नवविवाहिता पतिदेवांसह माहेरी गेली. तिथे या नवविवाहितेचे थाटात स्वागत करण्यात आले. माहेरच्या मंडळींना विडे दिल्यानंतर माहेरवाशिणीची पाठवणी केली. तिला लागणारी एखादी संसारोपयोगी वस्तू अथवा ऐपतीप्रमाणे काहीतरी वस्तू अथवा दागिना देण्याची प्रथा जपली.

ओवसा साजरा
गौरी सजवण्याप्रमाणे नवविवाहितांचा हौसा असल्याने अनेकांच्या घरामध्ये सजवलेल्या सुपामध्ये वडे, सुपारी, विडा, पाच प्रकारची फळे ठेवून ओवसा (हौसा) तयार करण्यात आला. ग्रामीण भागांमध्ये वाडीमध्ये हौसा फिरवून नंतर माहेरी हौसा नेण्याची प्रथा आहे. ही प्रथा आजही गावागोवी पाळली जात आहे.
 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:03 12-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow