'जीवन आणि वैद्यकीय विम्यावरील GST हटवा'; नितीन गडकरींचं निर्मला सीतारमन यांना पत्र

Jul 31, 2024 - 14:04
 0
'जीवन आणि वैद्यकीय विम्यावरील GST हटवा'; नितीन गडकरींचं निर्मला सीतारमन यांना पत्र

नवी दिल्ली : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वित्तमंत्री निर्मला सीतारमन यांना पत्र लिहून महत्त्वाचं आवाहन केलं आहे. नितीन गडकरी यांनी जीवन विमा आणि वैद्यकीय विम्याच्या हप्त्यावर आकारण्यात येणारा १८ टक्के जीएसटी हटवण्याची मागणी निर्मला सीतारमन यांच्याकडे केली आहे.

या पत्रात नितीन गडकरी यांनी लिहिलं की, नागपूर विभागातील जीवन विमा मंडळाच्या कर्मचारी संघटनेने यासंदर्भात मला एक पत्रक दिलं आहे. जीवन विमा आणि वैद्यकीय विम्यावर १८ टक्के जीएसटी लावणं म्हणजे जीवनाच्या अनिश्चिततेवर कर आकारण्यासारखं आहे, असेही नितीन गडकरी यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे.

वित्तमंत्र्यांना लिहिलेल्या या पत्रात गडकरी यांनी सांगितलं की, मला पत्रक देणाऱ्या विमा संघटनेच्या मते जीवनातील अनिश्चितेबाबत सुरक्षिता मिळवण्यासाठी विम्याचे हप्ते भरण्यावर कर आकारला जाता कामा नये. त्याचप्रमाणे वैद्यकीय विम्यावर १८ टक्के जीएसटी आकारणं सामाजिकदृष्ट्या आवश्यक असलेल्या या क्षेत्राच्या विकासात अडथळा ठरत आहे.

नितीन गडकरी या पत्रात पुढे म्हणाले की, संघटनेने जीवन विम्याच्या माध्यमातून बचत होण्यासाठी सुविधा, वैद्यकीय विम्याच्या हप्त्यासाठी प्राप्तिकरामध्ये कपात आदींची नव्याने सुरुवात करण्यासह सार्वजनिक क्षेत्रामधील सामान्य विमा कंपन्यांच्या एकीकरणाचा मुद्दाही उपस्थित केला.

जीवन विमा आणि वैद्यकीय विम्याच्या हप्त्यांवर जीएसटी भरणं हे अनेक ज्येष्ठ नागरिकांसाठी आव्हानात्मक आहे. त्यामुळे जीवन विमा आणि वैद्यकीय विम्याच्या हप्त्यांवर आकारण्यात येत असलेला जीएसटी मागे घेण्यााबाबत प्राधान्यक्रमाने विचार करावा, कारण तो ज्येष्ठ नागरिकांसाठी एक प्रकारचं ओझं ठरत आहे, असं आवाहन नितीन गडकरी यांनी केलं.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:30 31-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow