Paris Olympics 2024 : आयुष्यातील सर्वात कठीण पराभव! ऑलिम्पिक स्पर्धेतून बाहेर होताच पी.व्ही. सिंधू भावूक

Aug 2, 2024 - 15:28
 0
Paris Olympics 2024 : आयुष्यातील सर्वात कठीण पराभव! ऑलिम्पिक स्पर्धेतून बाहेर होताच पी.व्ही. सिंधू भावूक

पीव्ही सिंधू ऑलिम्पिकमध्ये पदकाची हॅटट्रिक मारेल असे तमाम भारतीयांना अपेक्षित होते. पण, गुरुवारी रात्री झालेल्या लढतीत भारताच्या अपेक्षांना मोठा धक्का बसला. चीनच्या खेळाडूने सिंधूचा पराभव करून तिचे स्पर्धेतील आव्हान संपवले.

स्पर्धेबाहेर होताच सिंधूने एक भावनिक पोस्ट करत आपला संघर्ष मांडला. तसेच तिने भवितव्याबद्दल भाष्य करून निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. गुरुवारी भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदकविजेत्या पीव्ही सिंधूचा (PV Sindhu) सामना झाला. चीनच्या हे बिंग जिओ (He Bingjiao) हिने सिंधूचा २१-१९, २१-१४ असा पराभव करत तिचा प्रवास संपवला.

पराभवानंतर सिंधूने पोस्टच्या माध्यमातून म्हटले की, पॅरिस २०२४ हा एक सुंदर आणि तितकाच कठीण प्रवास होता... पण, निराशाजनक पराभव झाला. हा पराभव माझ्या कारकिर्दीतील सर्वात कठीण आहे. हे स्वीकारायला थोडा वेळ लागेल, पण आयुष्य जसजसे पुढे सरकत जाईल तसतसे मी त्याच्याशी जुळवून घेईन अशी मला खात्री आहे. पॅरिस २०२४ चा प्रवास ही एक लढाईच होती. दोन वर्षे दुखापतीचा सामना केल्यानंतर इथपर्यंत पोहोचला आले. या आव्हानांना न जुमानता इथे उभे राहून तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये माझ्या देशाचे प्रतिनिधित्व केले यामुळे मला खरोखरच धन्य वाटते.

तसेच या स्तरावर मी स्पर्धा करून आणि त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे एका पिढीला प्रेरणा दिल्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजते. या काळात अनेकांचे मेसेजेस आले... यामुळे मोठा दिलासा मिळत गेला. मी आणि माझ्या टीमने पॅरिस २०२४ साठी आमच्याकडे जे आहे ते सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. माझ्या भवितव्याबद्दलही मला व्यक्त व्हायचे आहे. मी स्पष्ट करते की, एका छोट्या विश्रांतीनंतर मी पुन्हा माझे काम सुरू करेन. माझ्या शरीराला आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे माझ्या मनाला त्याची खूप गरज आहे. तसेच मला खूप आवडत असलेला खेळ खेळण्यात अधिक आनंद मिळवण्यासाठी मी पुढील प्रवासाचे काळजीपूर्वक मूल्यमापन करण्याची योजना आखत आहे.

दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने आतापर्यंत तीन कांस्य पदके जिंकली आहेत. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने रविवारी पदकाचे खाते उघडले.तर दुसरे पदक मनूने सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:57 02-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow