संगमेश्वर : गडनदीच्या पुरामुळे भातशेती कुजली

Aug 3, 2024 - 14:11
 0
संगमेश्वर : गडनदीच्या पुरामुळे भातशेती कुजली

माखजन : गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा फटका संगमेश्वर तालुक्यातील गडनदी लगतच्या गावांना बसला आहे, धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे नदी पात्रालगतची भातशेती कुजून गेली आहे. मात्र या सर्व नुकसानीकडे विमा कंपन्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

गडनदी लगत असलेल्या करजुवे, धामापूर, माखजन, सरंद, बुरंबाड, कोंडीवरे, आरवली आदी भागात गेले महिनाभर अतिवृष्टीमुळे गडनदीचे पाणी सलग १० ते १५ दिवस भातशेतीत भरले होते. अनेक दिवस भातशेती पुराच्या पाण्याखाली गेल्याने भातशेती कुजून गेली आहे.

ही घटना विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या लक्षात आणून देऊनही याकडे विमा कंपन्यांनी पाठ फिरवली असल्याचे बुरंबाड येथील शेतकरी व ग्रामपंचायत सदस्य संदीप कवळकर यांनी सांगितले. बाधित क्षेत्र असलेल्या ग्रामपंचायतींनी विमा कंपन्यांना पंचनामे करण्याची विनंती करून देखील या विनंतीकडे विमा कंपन्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप संदीप कवळकर यांनी केला आहे. त्यामुळे या समस्येकडे जिल्हा प्रशासनाने आता लक्ष देण्याची गरज आहे.

भविष्यात नुकसान होवून शेतकरी अडचणीत येऊ नये, यासाठी शेतकरी आर्थिक भुर्दंड सोसून विमा भरत असतो. परंतु शेतकऱ्यांवर प्रत्यक्ष वेळ आल्यावर विमा कंपन्या मात्र, या नुकसानीच्या भरपाईकडे दुर्लक्ष करत असल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गडनदी लगतच्या शेतीचे पंचनामे होऊन विमा कंपन्यांनी विमा संरक्षण त्वरित द्यावे, अशी मागणी येथील शेतकऱ्यांकडून आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:39 PM 03/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow