महापुराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय केले रिकामे

Jul 26, 2024 - 14:49
 0
महापुराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय केले रिकामे

कोल्हापूर : गुरूवारी सकाळी राधानगरी धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर तसेच मागील दोन महापुरांचा अनुभव गाठीशी घेत जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्यावरील सर्व विभागांमधील दफ्तर सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

पुराचे पाणी येणाऱ्या सर्व विभागांनी महत्त्वाच्या कागदपत्रांची बांधाबांध सुरू केली. सायंकाळी सर्व दफ्तर कपाटांच्या वर तसेच वरच्या मजल्यावरील कार्यालयांमध्ये ठेवण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या इमारतीच्या तळमजल्यावर चार ते पाच फूट पुराचे पाणी येते. जिल्हाधिकारी बसतात त्यामागील इमारतीत दोन फुटांवर पाणी येते. मुख्य धोका हा समोरच्या जुन्या इमारतीला असतो. येथे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे दालन, राजशिष्टाचार, गावठाण, जमीन, गृह, आस्थापना, वन असे वेगवेगळे विभाग आहेत. नव्या इमारतीत खालच्या मजल्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासह नगरपालिका, ग्रामपंचायत, महसूल, भूसंपादन, मुख्यमंत्री सचिवालय, करमणूक, जिल्हा खनिकर्म असे विभाग आहेत.

मागील पुराच्या काळात काही दफ्तर पाण्याने भिजून खराब झाले होते. तो अनुभव गाठीशी असल्याने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी आधीच सर्व विभागांना दफ्तर, संगणकासह सर्व साहित्याची बांधाबांध करून ते सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सांगितले आहे. त्यामुळे गुरूवारी सकाळी राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडल्याचे कळताच या सर्व विभागांनी दफ्तर बांधून सुरक्षित ठिकाणी हलवले. नव्या इमारतीत दोन ते तीन फूट पाणी येते. त्यामुळे येथील विभागांनी त्यांचे दफ्तर टेबलांवर तसेच कपाटांवर ठेवले आहे.

पाणी तातडीने निचरा होण्याची व्यवस्था

जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अंतर्गत रस्त्याचे वारंवार डांबरीकरण झाल्याने तो कार्यालयाच्या पायरीच्या बरोबरीने आला होता. त्यामुळे पुराचे पाणी लगेच कार्यालयात शिरायचे. मात्र वर्षभरापूर्वी हा भराव काढून रस्ता चार फुटांनी खाली केला आहे. रस्ता पायऱ्यांच्या खाली गेला आहे, शिवाय पाणी तातडीने निचरा होण्याची व्यवस्था केली आहे. त्याचा उपयोग यंदाच्या पुरात होतो का हे बघावे लागेल.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:19 26-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow