खेड : चोरवणे गडकरवाडी-उतेकरवाडीला जोडणारा साकव धोकादायक

Aug 5, 2024 - 11:20
 0
खेड : चोरवणे गडकरवाडी-उतेकरवाडीला जोडणारा साकव धोकादायक

खेड : तालुक्यातील चोरवणे गाव अतिशय दुर्गम आणि डोंगराळ भागात असून या भागात अतिवृष्टी होत असते. २१ व २२ जुलै २०२१ रोजी अतिवृष्टीमुळे नदीला पूर येऊन पाण्याचा मोठा लोंढा चोरवणे गडकरवाडी आणि उतेकरवाडीला जोडणाऱ्या साकवाला धडकला होता. त्यामुळे साकवाचे मोठे नुकसान झाले. मात्र त्यानंतर सन २०२४ चा पावसाळा आला तरी संबंधित विभागाने या साकवाची दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे नागरिकांना त्यावरून धोकादायक प्रवास करावा लागत आहे.

सन १९६० ते १९६२ दरम्यान चोरवणे गडकरवाडी आणि उतेकरवाडीला जोडणारा हा साकव आहे. ५० मीटर लांबीचा व तीन मीटर रुंदी असलेल्या या साकवाचा वापर उतेकरवाडी, बौद्धवाडी, गडकरवाडी, शिंदेवाडी, हनुमंतवाडी, डांगेवाडी, सुतारवाडी जखमीची वाडी येथील ग्रामस्थ करतात. नदीच्या पलीकडे उतेकरवाडी या ठिकाणी शासकीय कार्यालय पोस्ट ऑफिस, ग्रामपंचायत, रेशन दुकान, एसटी थांबा, शाळा हे सर्व आवश्यक साधने असल्याने रात्रंदिवस नाईलाजास्तव या साकवावरून ग्रामस्थांना ये-जा करावे लागत आहे. 

शासकीय कर्मचारी, अधिकारी येऊन या साकवाची पाहणी करून छायाचित्र घेवून पंचनामा करून गेले आहेत. ग्रुप ग्रामपंचायत यांनी यापूर्वीच ठराव घेऊन संबंधित कार्यालय व लोकप्रतिनिधी यांच्याकडे प्रस्ताव दिलेला आहे. या साकवाचे दुरुस्ती काम लवकरात लवकर व्हावे, अशी चोरवणे ग्रामस्थांच्यावतीने मागणी करण्यात आली होती. परंतु ३ वर्षे उलटून देखील संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करत आहेत. स्थानिक आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्याने येथील ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 05/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow