रत्नागिरी : मनसे पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे - अविनाश सौंदळकर

Aug 6, 2024 - 10:19
Aug 6, 2024 - 13:29
 0
रत्नागिरी : मनसे पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे - अविनाश सौंदळकर

रत्नागिरी  : आरजू टेक्सोल कंपनीने रत्नागिरीमधील गोरगरीब जनतेला खोटी आश्वासने देऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे. याचा पाठपुरावा करून पोलिस प्रशासनास कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र सैनिक व पदाधिकाऱ्यांनी भाग पाडले म्हणून आमच्या पदाधिकाऱ्यांना हेरून त्यांना खंडणीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांचे खच्चीकरण करण्यासाठीचा हा सगळा खटाटोप आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी केला आहे.

मनसेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आरजू टेक्सोलवर ५७८ गुंतवणूकदारांची सुमारे ७ कोटी (समोर आलेल्या तक्रारदारानुसार) रुपयांची फसवणूक केल्याप्रकारणी गुन्हा दाखल झाला. १५ हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल झाले. ती कंपनी आमच्या पदाधिकाऱ्यांवर खंडणीसारखे गुन्हे दाखल करते. याच्यामागे पक्षाची बदनामी करण्यासाठीच कोणाचे तरी षड्यंत्र आहे. या कंपनीने हजारो लोकांची फसवणूक केलेली आहे. फसवणूक झालेल्या लोकांनी अनेक लोकांकडे मदतीसाठी तक्रारी दिलेल्या आहेत.
 
तशा तक्रारी आमच्या काही कार्यकर्त्याकडे आल्या होत्या. त्याचा जाब कंपनीला विचारण्यासाठी गेलेही असतील; परंतु ज्या तत्परतेने पोलिस आरजू कंपनीच्या तक्रारीवर तत्परता त्या जर आरजू कंपनीकडून फसवणूक झालेल्या सामान्य नागरिकांनी दिलेल्या तक्रारीवर तत्परता दाखवली असती तर जनतेला न्याय मिळाला असता. महाराष्ट्र सैनिक दोषी आढळले तर पक्ष कारवाई करेलच; परंतु या कंपनाचे २ संचालक अटकेत आहेत व एक अजून पसार आहे. ही कारवाई करण्यास मनसे सैनिकानी भाग पाडले म्हणून आमच्यावर कारवाई होत आहे. हे सगळे कोण करतेय, कशासाठी करतेय हे लवकरच जनतेसमोर येईलच आमच्यावर कितीही खोटे गुह्ने दाखल केले म्हणून आमचा महाराष्ट्र सैनिक थांबणार नाही. कारण, परिस्थिती जितकी गंभीर महाराष्ट्र सैनिक तितकाच खंबीर, हे या कटामागील कलाकाराने लक्षात ठेवावे, असे आव्हान जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी पत्रकातून दिले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:42 PM 06/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow