रक्त तयार करता येत नसल्याने रक्तदानाविषयी जागृती हवी : डॉ. अलिमिया परकार

Aug 7, 2024 - 11:07
 0
रक्त तयार करता येत नसल्याने रक्तदानाविषयी जागृती हवी : डॉ. अलिमिया परकार

त्नागिरी : विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी प्रयोगशाळेत रक्ताची निर्मिती करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे माणूस हाच रक्ताचा एकमेव स्रोत असल्याने समाजामध्ये रक्तदानविषयी जागृती निर्माण करुन अधिकाधिक नवीन रक्तदाते तयार होण्यासाठी आग्रहपूर्वक प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ डॉ. अलिमियाँ परकार यांनी केले.

धन्वंतरी धर्मादाय संस्थेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्ताने येथील गुरुकृपा मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी संस्थेच्या आजपर्यंतच्या वाटचालीबद्दल समाधान व्यक्त केले.

संस्थेचे अध्यक्ष अजय भिडे यांनी धन्वंतरी संस्थे उद्दिष्टाविषयी थोडक्यात माहिती दिली. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करण्याच्या उद्देशाने धन्वंतरी संस्था स्थापन झाली. धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून संस्थेला जून २०२२ मध्ये नोंदणी प्रमाणपत्र मिळाले. सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्रम कार्यान्वित करण्याच्या दृष्टिकोनातून संस्थेच्या सदस्यांच्या बैठकीतून आरोग्य विषयाला प्राधान्य देण्याचे ठरले. त्याचाच भाग म्हणून परकार हॉस्पिटलमध्ये पहिल्या मजल्यावर १ ऑगस्ट २०२२ पासून रत्नागिरी रक्तसाठवणूक केंद्र सुरू झाले. हे रत्नागिरी रक्तसाठवणूक केंद्र कोल्हापूरमधील वैभवीलक्ष्मी रक्तपेढी या मातृपेढीबरोबर सामंजस्य करार करून तसेच अधिकृत शासकीय मान्यता आणि नियमावलीनुसार गेली दोन वर्षे रत्नागिरीकरांना सेवा देत आहे. संस्थेच्या माध्यमातून रत्नागिरी शहर आणि ग्रामीण भागात रत्नागिरीमधील रक्ताच्या तुटवड्याचा अंदाज घेऊन रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. या शिबिरांमधून मिळालेल्या रक्ताचे योग्य पृथःकरण अत्याधुनिक प्रयोगशाळेत करून नंतर रत्नागिरीमधील रक्तसाठवणूक केंद्रामध्ये रुग्णांना उपलब्ध करून दिले जाते.

या केंद्राचा दुसरा वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला. त्यावेळी उपाध्यक्ष तसेच रक्तसंकलन केंद्राचे रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. श्रीविजय फडके यांनी रत्नागिरीकरांसाठीच चालू असलेल्या या केंद्राच्या भविष्यकाळातील योजनांची माहिती दिली. आजपर्यंत संस्थेमार्फत केलेल्या रक्तसंकलन केलेल्या पिशव्यांच्या संख्येपेक्षा जवळपास तिपटीने रक्तपिशव्या आणि इतर रक्तघटक रत्नागिरीकरांना उपलब्ध करून दिल्याचे समाधान असल्याचे नमूद केले. भविष्यात अधिक चांगली सेवा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी संस्थेने आजपर्यंत रक्त विषयामध्ये केलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. संस्थेने गरीब आणि गरजू रुग्णांसाठी आणि जनतेसाठी निव्वळ नफा डोळ्यांसमोर न ठेवता काम करावे, अशी त्यांनी सूचना केली.

प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. संघमित्रा फुले जिल्हा शल्यचिकित्सक असताना त्यांनी या केंद्राला शासकीय मान्यता दिली होती. त्यांनीच केंद्राचे उद्घाटन केले होते. त्यांनी रक्तसंकलन केंद्राच्या कार्याचा आढावा घेऊन संस्थेला शुभेच्छा दिल्या. आवश्यकतेनुसार रक्तदान शिबिरांचे आयोजन करुन रुग्णांना रक्त आणि रक्तघटक उपलब्ध करून देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करून भविष्यामधील रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी संस्थेने कार्य करावे. हे केंद्र म्हणजे रत्नागिरीकरांनी रत्नागिरीकरांसाठी अवयवदानासारखाच रक्तदानासाठी उभा केलेला विश्वासू आणि समर्थ पर्याय असल्याचे त्यांनी नमूद केले. रत्नागिरीतील काही नागरिकांनी या संस्थेविषयी चालू केलेल्या अपप्रचाराला सुज्ञ रत्नागिरीकरांनी बळी पडू नये. संस्थेला जास्तीत जास्त सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

समारंभाला वैभवीलक्ष्मी रक्तपेढीचे संचालक अनमोल कामत, संस्था सदस्य आणि रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. सौ. ज्योत्स्ना देशपांडे, सदस्य डॉ. अरुण डिंगणकर, रक्तसाठवणूक केंद्र तंत्रज्ञ आणि संस्था सदस्य रोहिणी जोशी आणि इतर सदस्य उपस्थित होते.

यानिमित्ताने धन्वंतरी संस्थेबरोबर रक्तदान शिबिरांचे आयोजन केलेल्या राष्ट्रीय सेवा समिती, शिवप्रतिष्ठान, स्वामी स्वरूपानंद देवस्थान, श्रीक्षेत्र गणपतीपुळे देवस्थान, अनबॉक्स, ॐ साई मित्रमंडळ, कोकणनगर मित्रमंडळ, पावस दशक्रोशी ब्राह्मण मंडळ, हरिहरेश्वर देवस्थान-गोळप, सद्गुरू अनिरुध्दबापू संस्थान, मोरया मित्रमंडळ-आडिवरे, पोदार विद्यालय, एसटी, मुकुल माधव फाउंडेशन, फिनोलेक्स कामगार संघटना, जिंदाल कंपनी, छावा प्रतिष्ठान, सिद्धेश शिवलकर मित्रमंडळ, धोपटवाडी मंडळ-वाटद या संस्थांना सन्मानचिन्ह,सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.

 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 07-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow