रत्नागिरीत रानभाज्यांची २२ हजारांची विक्री

Aug 8, 2024 - 11:38
Aug 8, 2024 - 11:39
 0
रत्नागिरीत रानभाज्यांची २२ हजारांची विक्री

रत्नागिरी : पिज्जा, बर्गरपेक्षाही पावसाळ्यातील रानभाज्या किती आरोग्यदायी आणि पौष्टिक आहेत, हे मुलांना पटवून देण्यासाठी लायन्स क्लबतर्फे रत्नागिरी रानभाज्या महोत्सव आणि पाककला स्पर्धा घेण्यात आली. या महोत्सवात टाकाळा, अळू, कुरडू, भारंगी, कुडाच्या शेगा, शेवगा, फोडशी, सुरण, डिंडा, रानमाठ काटलं, आदी रानभाज्यांतून दिवसभरात २२ हजार रुपयांची विक्री झाली. या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शहरातील जयेश मंगल पार्क येथे आयोजित या महोत्सवाचे उद्‌घाटन जिल्हा कृषी अधिकारी जालिंदर पांगारे, अपर पोलिस अधीक्षक जयत्री गायकवाड, प्रांताधिकारी जीवन देसाई, लायन्स करुन ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष गणेश धुरी, सचिव विशाल ढोकळे, खजिनदार अमेय बोरकर आदीच्या उपस्थितीत झाले. ग्रामीण भागातील अनेक महिलांनी सहभाग घेतला. पावसाळ्यात उगवणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्यांचे सुमारे ३२ विक्री स्टॉल होते. रानभाज्यांचे महत्त्व मुलांना समजावे यासाठी शहरातील शाळांमधील मुलांना या महोत्सवात बोलावले होते. महोत्सवाला भेट दिल्यानंतर ग्रामीण भागातील मुलांना काही भाज्यांची नावे समजली, परंतु अनेक मुलांना भाज्या ओळखताही आल्या नाहीत, या भाज्यांची ओळख आणि आरोग्यासाठीचे महत्त्व मुलांना पटवून देण्यात आले.

याप्रसंगी दामले शाळेचे शिक्षक योगेश कदम म्हणाले, पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्यांचे महत्व मुलांना समजले पाहिजे. शहरात राहणाऱ्या मुलांना रानभाज्यांबाबत माहिती नसते. या भाज्यांची पौष्टिकता काय आहे, त्याची जाणीव व्हावी यासाठी आम्ही मुलांना घेऊन आलो. मुलांना रानभाज्यांबाबत चांगले ज्ञान मिळाले. या भाज्यांपासूनच पाककला स्पर्धा घेण्यात आली.

कोकणात येणाऱ्या भाज्या ७७ किती चविष्ट असतात तसेच डायबेटीस, मूळव्याध, आदींसारख्या रोगांवर या भाज्या गुणकारी आहेत. या विषयीची माहिती मुलांना व्हावी हा महोत्सवाचा हेतू होता. पिज्जा, बर्गर बाजूला ठेवून रोजच्या जेवणात रानभाज्या याव्यात. असा आमचा प्रयत्न आहे. - गणेश धुरी, अध्यक्ष लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 PM 08/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow