सोमवारी, शुक्रवारी प्रवासी राजा दिन

Aug 9, 2024 - 10:30
Aug 9, 2024 - 12:34
 0
सोमवारी, शुक्रवारी प्रवासी राजा दिन

लांजा : प्रवाशांच्या समस्या, तक्रारीवजा सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलदगतीने निराकरण करण्यासाठी प्रत्येक एसटी आगारात दर सोमवारी व शुक्रवारी प्रवासी राजा दिन आयोजित करण्यात येणार आहे. हे अभियान १५ जुलैपासून सुरू झाले असून लांजा आगारातर्फे याची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे, असे आगारप्रमुख काव्या पेडणेकर यांनी सांगितले. 

प्रवासी राजा दिन या अभियानाचा उद्देश म्हणजे प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा-महाविद्यालये यांनी समस्या, तक्रारी, सूचना लेखी स्वरूपात दर सोमवारी व शुक्रवारी संबंधित आगारात सकाळी १० ते २ या वेळेत मांडायच्या आहेत. त्यावर विभाग नियंत्रक तातडीने कार्यवाही करतील. लांजा आगारात ९ ऑगस्टला हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक लेखी तक्रारीची नोंद ठेवण्यात येणार असून यावर मध्यवर्ती कार्यालय लक्ष ठेवणार आहे. या निमित्ताने लांजा येथील एसटी बसस्थानक, अस्वच्छ प्रसाधनगृह या समस्यांना वाचा फुटेल. एसटी बसेस स्वच्छ व वेळापत्रकानुसार वेळेत मार्गस्थ करणे, ठरलेल्या थांब्यांवर एसटी थांबवणे या सारख्या उद्भवणाऱ्या समस्याही सुटणार आहेत. तक्रारींचे निराकरण वेळेत झाल्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:58 PM 09/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow