रत्नागिरी : खल्वायनच्या मासिक संगीत सभेत आज संपदा माने-कदम यांचे गायन

Aug 10, 2024 - 11:07
 0
रत्नागिरी : खल्वायनच्या मासिक संगीत सभेत आज संपदा माने-कदम यांचे गायन

रत्नागिरी : येथील खल्वायन संस्थेची ३०४ वी मासिक संगीत सभा शनिवारी, दि. १० ऑगस्ट रोजी होणार असून या मैफलीमध्ये मुंबईच्या व्यावसायिक संगीत रंगभूमीवरील आघाडीची सुप्रसिद्ध गायिका सौ. संपदा माने - कदम यांच्या शास्त्रीय-उपशास्त्रीय तसेच अभंग नाट्यगीत गायन होणार आहे.

सौ. संपदा माने-कदम यांनी संगीत विशारद (भारतात द्वितीय क्रमांक) व संगीत अलंकार (भारतात प्रथम क्रमांक) या पदव्या प्राप्त केल्या आहेत.. एमए (इंग्लिश) व एमए ( म्युझिक) या पदव्यासुद्धा त्यांना प्राप्त आहेत. त्यांचे संगीताचे प्राथमिक शिक्षण कोल्हापुरातील प्रसिद्ध हार्मोनियम वादक श्री. द्वारकानाथ पै आणि डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांच्याकडे झाले. त्यानंतर २००५ ते२ ०१६ या काळात सलग ११ वर्षे त्यांनी शरद बेनाडीकर यांच्याकडे जयपूर अत्रौली घराण्याच्या गायकीची शास्त्रशुद्ध तालीम घेतली. त्यानंतर ३ वर्षे विदुषी शाल्मली जोशी यांच्याकडे त्यांनी तालीम घेतली. सध्या गानसरस्वती किशोरी अमोणकर यांचे शिष्य जयपूर अत्रौली घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. अरुण द्रविड यांच्याकडून त्या शास्त्रीय गायनाचे मार्गदर्शन घेत आहेत. नाट्यसंगीतासाठी ज्येष्ठ ऑर्गनवादक मकरंद कुंडले यांच्याकडे विशेष तालीम चालू आहे. संगीत नाटकांमधील सादरीकरणासाठी प्रमोद पवार, ज्ञानेश पेंढारकर, विजय गोखले, अरविंद पिळगावकर, मुकुंद मराठे, रजनी जोशी या गुरुजनांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले आहे. संन्यस्त खड्ग, हाच मुलाचा बाप, एकच प्याला, स्वयंवर या संगीत नाटकांमधून त्यांनी प्रमुख भूमिका केल्या असून राज्य नाट्य स्पर्धेत त्यांना दोन वेळा रौप्य पदक मिळाले आहे. शास्त्रीय संगीतासाठी आकाशवाणीची बी हाय ग्रेड तसेच केंद्र सरकारची सीसीआरटी शिष्यवृत्ती, मिनिस्ट्री ऑफ कल्चर स्कॉलरशिप तसेच एनसीपीए या संस्थेतर्फे दिली जाणारी सुरश्री केसरबाई केरकर शिष्यवृत्ती त्यांना मिळाली आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील सूर नवा ध्यास नवा - आशा उद्याची या पर्वाच्या त्या उपविजेत्या असून झी स्टुडिओजच्या पांडू या चित्रपटासाठी त्यांनी पार्श्वगायन केले आहे. त्यासाठी त्यांना दोन पुरस्कार मिळाले आहेत. भारतात अनेक ठिकाणी त्यांचे शास्त्रीय, उपशास्त्रीय तसेच नाट्य संगीत व सुगम संगीताचे कार्यक्रम झाले आहेत.

रत्नागिरीतील त्यांच्या कार्यक्रमाला हार्मोनियम साथ चैतन्य पटवर्धन व तबला साथ अथर्व आठल्ये हे नामवंत वादक करणार आहेत. त्यांची मैफल शनिवारी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत नेहमीप्रमाणेच सौ.गोदूताई जांभेकर विद्यालय, एस टी स्टँडसमोर, रत्नागिरी येथे होणार असून कै. अँड प्रसाद महाजनी स्मृती मासिक संगीत सभा म्हणून साजर्‍या होणारी ही संगीत सभा दरवर्षीप्रमाणे फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडने प्रायोजित केली आहे. मैफल सर्व रसिकांना विनाशुल्क असून रसिकांनी मैफलीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन संस्था अध्यक्ष मनोहर जोशी यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 10-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow