कोकण रेल्वे दुपदरीकरण व बंदर विकासासाठी खा. रवींद्र वायकर यांचे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना निवेदन

Aug 10, 2024 - 14:51
Aug 10, 2024 - 15:00
 0
कोकण रेल्वे दुपदरीकरण व  बंदर विकासासाठी खा. रवींद्र वायकर यांचे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना निवेदन

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्याचे सुपुत्र असलेले आणि माजी पालकमंत्री राहिलेले खा. रवींद्र वायकर हे कोकणातील बंदर विकास आणि कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणासाठी सरसावले आहेत. याबाबत त्यांनी  बंदर विकासमंत्र्यांना निवेदन दिले असून, कोकण रेल्वेचे दुपदरीकरण लवकर पूर्ण करावे आणि कोकणातील बंदरांचा विकास झाल्यास कोकणचे अर्थकारण बदलेल आणि विकासाला चालना मिळेल, अशी मागणी त्यांनी केली आहे.

कोकण रेल्वे मार्गावरून दररोज चाकरमानी प्रवास करीत असतात; मात्र हा रेल्वेमार्ग एकेरी असल्याने अनेकवेळा लोकांची रखडपट्टी होते. त्यामुळे कोकण रेल्वेचा मार्ग दुहेरी होण्याचे स्वप्न कोकणातील चाकरमानी बघत आहे. कोकण रेल्वेचा मार्ग दुहेरी करावा, या मागणीचे निवेदन मुंबई उत्तर व पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार व रत्नागिरी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी गुरुवारी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना दिल्ली येथे दिले. निवेदन सध्या कोकण रेल्वे मार्ग एकेरी आहे. पनवेल ते वीर दरम्यान दुपदरीकरण झाले आहे; मात्र गणेशोत्सव, होळी, उन्हाळ्याच्या सुट्टीत दरवर्षी तीनशे कोटींहून अधिक प्रवासी कोकणात प्रवासी करीत असतात. फेस्टिव्हल ट्रेन सोडण्यात येताती; मात्र एकच ट्रॅक असल्याने कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडते आणि अनेकवेळा प्रवासी रखडतात. यामुळे कोकण रेल्वेच्या गाड्या वेळेत सुटत नाहीत आणि वेळेत पोहोचत नाहीत. दुपदरीकरणाचा प्रस्ताव एक वर्षापासून कोकण रेल्वे महामंडळाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करून तत्काळ मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी खा. वायकर यांनी केली.

तसेच कोकणातील बंदरांचा विकास करावा या मागणीसाठी खा. वायकर यांनी केंद्रीय जल वाहतूक मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची दिल्ली येथे भेट घेऊन निवेदन दिले. कोकणातील रत्नागिरी, दापोली, गुहागर, अलिबाग आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंदरांचा प्रामुख्याने विकास करावा. यामुळे कोकणमध्ये अर्थक्रांती होईल. कोकणातील बंदरांचा विकास झाल्यास आजूबाजूच्या वस्त्यांचा विकास वेगाने होईल. राज्याला ७२० कि.मी. चा समुद्रकिनारा लाभला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर, रत्नागिरी, रायगडमधील अलिबाग, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंदरांची देखील दुरूस्ती होत नसल्याने दुरवस्था झाली आहे. या बंदरांची देखभाल दुरूस्ती करून बंदरे नव्याने विकसीत केल्यास कोकणात जल वाहतूक सुरू होईल आणि त्यातून बंदरांच्या आजूबाजूच्या परिसराचा विकास होईल आणि त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. तसेच ज्या ठिकाणी बंदर निर्माण करता येऊ शकते अशा ठिकाणी ते निर्माण करावे. त्यामुळे मासेमारी, जल वाहतूक वाढेल. त्या दृष्टीने केंद्र शासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी माजी पालकमंत्री व खासदार रवींद्र वायकर यांनी केली आहे.

लवकरच मुख्यमंत्री व अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राहिलेले रवींद्र वायकर यांचे कोकण व जिल्हा विकासाकडे लक्ष आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी ते आता सरसावले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री आणि बंदर विकासमंत्र्यांची भेट घेऊन को. रे. चे दुपदरीकरण व बंदर विकासाचा मुद्दा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्र्यांनी लवकरच कोकण रेल्वे दुपदरीकरणासाठी संबंधित राज्यांचे मुख्यमंत्री आणि अधिकारी यांच्यासमवेत संयुक्त बैठक बोलाविली जाईल, असे आश्वासन खा. वायकर यांना दिले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:18 PM 10/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow