गुहागर : वेळणेश्वरच्या सड्यावर बहरली सीतेची आसवे

Aug 13, 2024 - 14:35
 0
गुहागर : वेळणेश्वरच्या सड्यावर बहरली सीतेची आसवे

गुहागर : या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे निसर्गदत्त प्रतिभा लाभलेल्या निसर्गकवी ना. धो. महानोर यांच्या कवितांचा श्रावण या कवितेतील हे काव्य मनाला आजही भावते. खरोखरच अशी अद्भूत किमया हिरव्या श्रावणाने साधली आहे. काळ्या रंगाच्या कातळावर निळ्या रंगाची सीतेची आसवे (डोळे) बहरलेली दिसून येत आहेत.

गुहागर तालुक्यातील वेळणेश्वरच्या माळरानावर गावराखा दिराच्या कातळांवर सीतेची आसवे बहरून आली आहेत. सीतेची आसवं हे फुल आहे. युट्रीक्युलारीया म्हणजेच 'सीतेची आसवे'. त्या फुलाच्या रंगरूपाला गोडवा आणणारं त्याचं नावही तितकच अस्सल मराठमोळं. सह्याद्रीच्या खडकाळ पठारांवर उगवणारी, बोटभर उंचीची आणि नखभर फुल मिरवणारी ही वनस्पती मांसाहारी आहे हे त्या फुलाकडे पाहून पटणं, निदान पहिल्या भेटीत तरी अशक्यच.

कीटकभक्षी वनस्पती म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर चिकट द्रावाचे द्रोण भरलेल्या वनस्पती येतात. पण, ही वनस्पती जराशी वेगळी आहे. या वनस्पतीच्या मुळांवर सूक्ष्म छिद्र आणि दाट केस असलेल्या पिशव्या असतात. या पिशव्या म्हणजे जणू जठरच. या पिशव्यांमधून अतिसूक्ष्म कीटक अडकतात आणि पचवलेसुद्धा जातात. उन्हाळ्यात भकास वाटणाऱ्या खडकांच्या कुशीत अशा अनेकविध वनस्पतींची सूक्ष्म बीजं रुपलेली असतात. या बीजांना अंकुरण्यासाठी त्यांचं घर सुरक्षित राखणं हे आपले कर्तव्य असते. कारण पावसाळ्यात या बीजांना अंकुर फुटून त्यांना फुलण्यास श्रावणमास भर घालीत असतो. श्रावणमासातील रंगीबेरंगी रानफुलांचे हे वैभव टिकविण्यासाठी आपल्याला गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:01 PM 13/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow