चिपळूण सरपंच संघटनेने ग्रामस्तरावरील समस्यांबाबत घेतली सीईओंची भेट

Aug 13, 2024 - 11:11
Aug 13, 2024 - 16:12
 0
चिपळूण सरपंच संघटनेने ग्रामस्तरावरील समस्यांबाबत घेतली सीईओंची भेट

चिपळूण : चिपळूण तालुका सरपंच संघटनेच्यावतीने जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांची भेट घेऊन विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली व त्यांना निवेदन देण्यात आले.

चिपळूण तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये काम करीत असताना अनेक अडचणी जाणवतात. त्या दूर कराव्यात, अशी मागणी सरपंच संघटनेतर्फे करण्यात आली. यावेळी तालुक्यातील घरकूल योजनेसंदर्भातील अनुदान तत्काळ वितरित करावे, ग्रा.पं.ची देयके अदा करणारे डाटा ऑपरेटर व त्यांचे वरिष्ठ यांच्याबाबत सातत्याने अडचणी येतात. पंधराव्या वित्त आयोगाच्या आराखड्यातील काम बदलाचे अधिकार ग्रा.पं. ग्रामसभा अथवा गटविकास अधिकारी यांच्याकडे असावेत, जलजीवन मिशन अंतर्गत सामायिक जमीन असल्याकारणाने अनेक ठिकाणी बक्षीसपत्राचा विषय निर्माण झाला आहे. यामुळे योजनेला अडचण येत आहे.

अतिवृष्टीमध्ये होणारे नुकसान आणि पंचनामा केल्यानंतर न मिळणारी नुकसानभरपाई याबाबत जि.प.ने विचार करावा, अशा विविध प्रश्नांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली. सरपंचांच्या तालुकास्तरावरील अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी यावेळी सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश शिर्के, मालघरचे सरपंच सुनील वाजे, कापसाळ सरपंच सुनील गोरिवले, पाचाडचे नरेश घोले, तोंडली-पिलवलीचे महेश सावंत आदी सरपंचांनी केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:37 PM 13/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow