आर्ट गॅलरीमुळे पर्यटनात होणार वाढ : पालकमंत्री उदय सामंत

Aug 16, 2024 - 10:33
 0
आर्ट गॅलरीमुळे पर्यटनात होणार वाढ : पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : रत्नागिरीतील पर्यटन किती ताकदीचे आहे, गडकोट, मंदिरे किती सुंदर आहेत याची अतिशय उत्तम कलाकृती आर्ट गॅलरीच्या माध्यमातून निर्माण करण्यात आली आहे. अख्खी रत्नागिरी तारांगणात वसवली आहे. त्यामुळे निश्चितच पर्यटनात वाढ होणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
    
येथील हिंदू हृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे तारांगण इमारतीमध्ये आर्ट गॅलरीचे लोकार्पण पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते गुरुवारी झाले. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, मुख्याधिकारी तुषार बाबर, माजी नगरसेवक सुदेश मयेकर, माजी नगरसेवक स्मिता पावसकर, माजी नगरसेवक बिपीन बंदरकर, माजी जि. प. सदस्य बाबू म्हाप, माजी नगरसेवक मुसाभाई काझी, माजी  नगरसेवक सुहेल मुकादम, माजी नगरसेवक मुन्ना चवंडे, माजी नगरसेवक उमेश कुलकर्णी, माजी नगरसेवक बंटी कीर, जे जे आर्ट आॕफ स्कुलचे कला शिक्षक सुनिल नांदोसकर यांच्यासह कलाकार, कलाशिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, रत्नागिरी शहर पर्यटन स्थळ बनतय, पर्यटन स्थळांमुळे बेरोजगारी दूर होणार आहे.  मंदिरे, किल्ले आदींची अतिशय सुंदर अशी कलाकृती आर्ट गॅलरीमध्ये उभारण्यात आली आहे. रत्नागिरी शहरातील पर्यटन, गडकिल्ले, मंदिरे एकत्र, एकाच ठिकाणी तारांगणामध्ये आल्यानंतर आर्ट गॅलरीच्या माध्यमातून बघणे शक्य आहे. यासाठी ऑर्ट गॅलरी साकारणाऱ्या श्री. नांदोसकर यांचे पालकमंत्री महोदयांनी कौतुक केले. सायन्स काय असत हे बाल मित्रांना येथेच तारांगणात बघता येणार आहे. पुढच्या आठ दिवसात सायन्स सिटीचेही उद्घाटन होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
     
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात बोलताना पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, 19 तारखेला रक्षाबंधन असताना जिल्ह्यातील 2 लाख 74 हजार 346 पैकी 1 लाख 98 हजार महिलांच्या खात्यात  3 हजार  जमा झाले आहेत. उर्वरित 76 हजार महिलांच्या खात्यात  आधार लिंक झाल्यांनतर येत्या दोन दिवसात पैसे जमा होणार आहेत. घरच्या आर्थिक नियोजनाबरोबरच महिलांनी स्वत:ची काळजी घ्यावी. त्यांनी स्वत:साठी पैसे खर्च करणे शक्य व्हावे, यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सुरु करण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद होणार नाही, असेही ते म्हणाले.
 
     
पाऊस थांबल्याने रत्नागिरीतील रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाली असून, काँक्रीटीकरणाचे काम देखील सुरु होईल. नागरिकांचे आयुष्यमान वाढण्यासाठी, त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
     
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत रु. 3 हजार जमा झालेल्या बहिणिंनी पालकमंत्री श्री. सामंत यांचे औक्षण करुन त्यांना राखी बांधली. तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कारही केला. मनोगत व्यक्त करताना माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी संपदा सावंत म्हणाल्या, खूप आनंद होत आहे. रक्षाबंधनापूर्वीच ही रक्कम जमा झाल्याने रक्षाबंधन आनंदाने साजरी होणार आहे. ज्या महिलांच्या खात्यात रक्कम रु. 3  हजार जमा झाले आहेत त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा द्विगुणीत झाला आहे. मुख्यमंत्री महोदय आणि पालकमंत्री महोदयांमुळे हे शक्य झाले असून, त्यांचे आपण आभार मानते.
    
कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक मुख्याधिकारी श्री. बाबर यांनी केले. कोनशिला अनावरण करुन फित कापून ऑर्ट गॅलरीचे लोकार्पण  करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन,
दीपप्रज्ज्वलनाने  कार्यक्रमाची सुरुवात झाली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 16-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow