कोयना वीजनिर्मिती प्रकल्पाच्या आधुनिकीकरणाला सुरुवात

Aug 1, 2024 - 12:18
Aug 1, 2024 - 15:21
 0
कोयना वीजनिर्मिती प्रकल्पाच्या आधुनिकीकरणाला सुरुवात

चिपळूण : कोयना वीजनिर्मिती प्रकल्पाच्या आधुनिकीकरणाला सुरुवात झाली आहे. पुढील २५ वर्षे हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती करेल. यासाठी या प्रकल्पात वीज निर्मिती करणाऱ्या यंत्रांची कार्यक्षमता व गुणवत्तावाढीचे काम हाती घेण्यात आले आहे. अशी माहिती महानिर्मिती कंपनीचे मुख्य अभियंता संजय चोपडे यांनी माहिती दिली.

महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळख असलेल्या कोयना प्रकल्पातून मागणीच्या वेळी तत्काळ वीजपुरवठा केला जातो. १६ मे १९६२ पासून आतापर्यंत या प्रकल्पातून स्वच्छ, नितळ व प्रदूषणविरहित वीजनिर्मिती सुरू आहे. महाराष्ट्रात कोळशावर आधारित अनेक औष्णिक वीज प्रकल्प उभे राहिले. यातील काही प्रकल्प काळाची गरज लक्षात घेऊन अपडेट करण्यात आले नाहीत. त्यामुळे ते प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर आहेत; मात्र साठ वर्षांहून अधिक काळ अविरत वीज निर्मिती करणाऱ्या कोयना प्रकल्पाच्या वीजनिर्मितीमध्ये भविष्यात कुठेही खंड पडू नये यासाठी महानिर्मिती कंपनीने या प्रकल्पाचे १८ संच टप्प्याटप्प्याने दुरुस्त करण्याचे ठरवले आहे. 

वीज निर्मिती करणारी एक मशीन नवीन घ्यायची झाल्यास बाजारामध्ये ती आठ ते दहा कोटीला मिळते अठरा मशीन नवीन घ्यायच्या झाल्यास महानिर्मिती कंपनीला अंदाजे १८० कोटीचा खर्च आला असता. कमी खर्चात अधिक काळ वीजनिर्मिती करता यावी यासाठी गव्हर्निंग प्रणाली आणि पीएलसी प्रणाली दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात उसले आहे. वीजनिर्मिती करणाऱ्या यंत्रावर पडणाऱ्या पाण्याचा प्रवाह नियंत्रणात ठेवण्यासाठी वहॉल्व्ह असतात. त्याला कंट्रोल करण्यासाठी गव्हर्निंग प्रणाली आणि पीएलसी प्रणाली असते. त्याची कार्यक्षमता आणि गुणवत्ता वाढवण्याचे काम महानिर्मिती कंपनीकडून हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी अंदाजे दहा ते बारा कोटीचा खर्च होणार आहे.

अॅडिट्स हायड्रोपॉवर आणि जीई पाँवर या दोन कंपन्या हे काम करत आहेत. अॅडिट्स हायड्रोपॉवर ही जागतिक नवीकरणीय ऊर्जा बाजारपेठेत गतिशीलपणे वाढणाऱ्या जलविद्युत केंद्रांसाठी इलेक्ट्रोमेकॅनिकल उपकरणे आणि सेवा पुरवणाऱ्या जगातील आघाडीच्या पुरवठादारांपैकी एक आहे. जीई पॉवर ही कंपनी संपूर्ण ऊर्जा मूल्य शृंखलामध्ये उभारणीपासून ते वापरापर्यंत तंत्रज्ञान, उपाय आणि सेवा प्रदान करते. या दोन कंपन्या कोयना प्रकल्पातील वीजनिर्मिती करणाऱ्या यंत्रांची कार्यक्षमता आणि गुणवत्ता वाढवणार आहेत.
  
कोयना प्रकल्पातून आजही पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती केली जाते. भविष्यात या प्रकल्पातून अखंडितपणे वीज निर्मिती व्हावी यासाठी काही उपाययोजना केल्या जात आहेत. सध्या विजेची मागणी कमी आहे. त्यामुळे दुरुस्तीचे काम सुरू आहे. संजय चोपडे, मुख्य अभियंता, महानिर्मिती कंपनी, पोफळी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:45 PM 01/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow