Ratnagiri : स्वातंत्र्य दिनी दहा जणांकडून उपोषण

Aug 16, 2024 - 13:24
 0
Ratnagiri : स्वातंत्र्य दिनी दहा जणांकडून उपोषण

रत्नागिरी : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील कर्मचारी संघटना सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक अशा तब्बल दहा उपोषणांनी सरकारचे लक्ष वेधून घेतले. आमदार राजन साळवी, जि.प.चे माजी अध्यक्ष उदय बने यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत आपले प्रश्न शासन दरबारी मांडण्याचे आश्वासन दिले. मोठ्या प्रमाणात उपोषणकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपस्थित राहिल्याने परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

आंदोलनकर्त्यांमध्ये प्रामुख्याने मानधन तत्त्वावरील शिक्षकांनी शिक्षणसेवक म्हणून नियुक्ती मिळण्यासाठी उपोषण केले. डी.एड., बी.एड. पदवीधर बेरोजगार हे मानधन तत्त्वावरील कंत्राटी शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांना दि.३० एप्रिल रोजी कार्यमुक्त करण्यात आले. जिल्ह्यातील शिक्षक आंतरजिल्हा बदलीने बाहेर गेल्यानंतर जिल्ह्यात शिक्षकांचा प्रश्न निर्माण झाला होता. यावेळी आम्ही केवळ ९ हजार मानधनावर विद्यार्थ्यांना शिकवले. शिक्षक उपलब्ध झाल्यानंतर आम्हाला कचर्याप्रमाणे उकीरड्यावर टाकण्यात आले. यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपोषण सुरू केले असून शासनाने आम्हाला शिक्षकसेवक म्हणून सामावून घ्यावे अशी मागणी त्यांनी केली. यावेळी आमदार राजन साळवी यांनी मानधन तत्त्वावरील शिक्षकांचा प्रश्न विधानसभेत मांडण्याचे आश्वासन दिले.

खेड तालुक्यातील भरणे येथील विशाल काते यांनी आपण कुणबी शिक्षक प्रसारस संस्था खेड संचलित न्यु इंग्लिश स्कूल शिवखुर्द या विनाअनुदानित शाळेत गेले १३ वर्षे कार्यरत असताना संस्थेत सेवाज्येष्ठता डावलून दिल्या गेलेल्या कर्मचाऱ्याच्या नियुक्तीला कोणत्या आधारे मान्यता दिली. या संदर्भात चौकशीअर्ज शिक्षण विभागाकडे दाखल करण्यात आला होता. परंतु शिक्षण विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने श्री.काते यांनी उपोषण केले.

सोन्याच्या दागिन्यांसह १३ लाख रुपयांची रोकड घेत ती परत न करणार्‍या मुलगा व सुनेविरोधात तक्रार करूनही शहर पोलिसांनी कोणतीच कारवाई न केल्याने रत्नागिरीतील नाचणे-शांतीनगर येथील सौ.रत्नमाला चंद्रकांत चौरगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण केले. सन २०१५ मध्ये माझा मुलगा वैभव चोरगे व सून अस्मिता चोरगे यांनी १८ ग्रॅम सोन्याचे दागिने व १३ लाख रुपयांची रोकड परत देतो असे सांगून घेऊन गेले. ते परत न केल्याने मी गेले ९ वर्षे पोलीस स्थानकात तक्रार देत असतानाही पोलिसांनी कोणतीच कारवाई न केल्याने आपण उपोषण करत असल्याचे सौ.चोरगे यांनी सांगितले आहे.

रत्नागिरीतील शिरगाव येथील फैयाज मुजावर यांनी जामा मस्जिद जमातुल मुस्लीमीन शिरगाव या संस्थेने आपल्यावर अन्याय करत त्यांनी केलेल्या बेकायदेशीर कारभार केला आहे. या विरोधात आपण जिल्हा वक्फ अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही कारवाई न केल्याने त्यांनी उपोषण केले.

राजापूर तालुक्यातील नाटे परिसरात गेले कित्येक वर्षे अनधिकृत व्यवसाय सुरू आहे. गोवा बनावटीची दारू, गावठी हातभट्टी, देशीदारू आदी व्यवसाय सुरू असून पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग कोणतीच कारवाई करत नसल्याने नाटे येथील सुनिल कामतेकर, प्रांजल लकळे, श्रुतिका बांदकर यांच्यासहीत सुमारे २० जणांनी उपोषण केले.

कुमार अजिंक्य मनिष तळेकर (वय १७) याला आत्महत्येस प्रवृत्त केलेल्या व्यक्तींवर कारवाई न झाल्याने मनिष उर्फ बाबू जगन्नाथ तळेकर यांनी उपोषण केले. आपला मुलगा अजिंक्य तळेकर याने वरळी कोळीवाडा येथे राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी श्री.तळेकर यांनी केली आहे.

शिक्षकांना ऑनलाईन कामासाठी संगणक, इंटरनेट सेवा देण्यात यावी अन्यथा ही कामे ग्रामपंचायतीकडे वर्ग करावीत यासहीत शिक्षकांच्या अन्य प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक प्रवीण किणे यांनी उपोषण केले.

माहिती अधिकार अंतर्गत मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या देवरूखमधील अधिकार्‍याविरोधात कारवाई करण्यासाठी देवरूख मधीलआळी येथील मनोहर गुरव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण केले. आपल्या निवेदनात त्यांनी १४ तक्रारींचा समावेश केला आहे. याकडे गटविकास अधिकारी देवरूख यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप श्री.गुरव यांनी केला आहे.

मे.प्रशांत प्रकाश लाड यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत साडेसात कोटी रुपयांची कामे घेण्याचे प्रमाणपत्रे असताना खेड तालुक्यात त्यांना ६० कोटी तर २९ अशी एकूण ८९ कोटींची कामे नियमबाह्य पद्धतीने देण्यात आली आहेत. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून दोषी अधिकार्‍यावर कारवाईसाठी अखिल भारत हिंदू महासभेचे प्रदेश सरचिटणीस, स्वप्नील खैर यांनी आपल्या सहकार्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण केले.

आर्जु टेक्सोल प्रायव्हेट लिमिटेडने उत्पादन बनवण्याच्या नावाखाली आमची फसवणूक केली आहे. संबंधितांवर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. परंतु आम्हाला आमची गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळवून देण्यासाठी फसवणूक झालेल्या विलास सुर्वे, दीपराज शिंदे, रूद्रा शिंदे, विष्णू परब, सुनिल दळवी यांच्यासह सुमारे २० ते २५ जणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:53 16-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow