रत्नागिरी : भातशेतीवर करप्याचा प्रादुर्भाव

Aug 17, 2024 - 16:57
 0
रत्नागिरी :  भातशेतीवर करप्याचा प्रादुर्भाव

रत्नागिरी : जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर भात लागवड वेळेत पूर्ण झाली; मात्र श्रवण सुरू झाल्यानंतर पावसाने उघडीप घेतल्यामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे. कडकडीत उन्हामुळे संगमेश्वर तालुक्यात धामणी, राजवाडी, गोळवलीसह काही भागात सुमारे दोन हेक्टर भातशेतीवर निळे भुंगेरे व करण्याचा प्रादुर्भाव झाला आहे तर राजापूर तालुक्यातील काही गावांमध्ये करपा रोग दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली असून, पावसाने अशीच दडी मारल्यास त्याचा फटका भात उत्पादनावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात सर्वत्रच पावसाने विश्रांती घेतल्यामुळे कमी-अधिक प्रमाणात निळे भुंगेरे आणि करपा दिसत आहे.

जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी आणि असमान पाऊस झाला. दुसऱ्या पंधरवड्यात पावसाचा जोर राहिल्यामुळे भात रोपवाटिकांना विलंब झाला होता. पुढे जुलै महिन्यात पावसाने जोर केल्यामुळे भात पुनर्लागवडीत कोणतीच अडचण आलेली नाही; मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाने उघडीप घेतली. (ता. १२) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासात सरासरी ४ मिमी पाऊस झाला आहे तसेच १ जूनपासून आतापर्यंत सरासरी २७९१.६८ मिमी पाऊस झाला असून, तुलनेत ७७ टक्केहून अधिक पाऊस पडला. त्यामुळे भातशेती तरारली आहे; मात्र ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाने उघडीप दिली. गेले चार दिवस कडकडीत ऊन पडल्यामुळे संगमेश्वर, राजापूर तालुक्यात भातशेतीवर करपा रोगासह निळ्या भुंगेरा किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. संगमेश्वर तालुक्यात धामणी, गोळवली, राजवाडी, वाशीतर्फे संगमेश्वर, कुळपे या गावात शेतीवर करपा आवळलेला आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतांमधील भाताची रोपे किडींनी फस्त केली आहेत. काही ठिकाणी रोपे उन्हामुळे पिवळी पडली आहेत. पावसाची स्थिती अशीच राहिली तर भात उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. किडींचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कृषी विभागाकडून तातडीने शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पाहणी केली आहे निळ्या भुंगाच्या अधिवक प्रादुर्भव आहे तर करपा किरकोळ ठीकाणी आहे. त्यावर अधिकाऱ्यांनी उपाययोजना सुचवलेल्या आहेत. 

दरम्यान, यंदा जिल्ह्यात ६७ हजार हेक्टरवर भात लागवड झालेली आहे. समाधानकारक पावसामुळे रोपवाढीला जोर मिळाला आहे; परंतु उन्हामुळे बळीराजावर संकट निर्माण झालेले आहे. कातळावरील भातशेतीला मोठा फटका बसू शकतो, असे शेतकऱ्यांचे मत आहे.

सरीवर पाऊस सुरू असल्यामुळे करपा रोगाचे भातशेतीवरील प्रादुर्भावाचे प्रमाण कमी आहे. मात्र पाऊस थांबून कडकाडीत उन पडल्यास करपा वाढेल. त्याचा परिणाम भातशेतीवर मोठ्या प्रमाणात होईल. शेतकऱ्यांना नुकसानीची झळ बसू शकते. - रवींद्र हळबे, शेतकरी

सध्या ऊन-पाऊस असे वातावरण असल्यामुळे काही ठिकाणी निळ्या भुगेच्याचा प्रादुर्भाव झालेला आहे. कृषी विभागाकडून प्रत्यक्ष पाहणी केली असून त्यावर उपायही सुचवलेले आहेत. करपा किंवा तत्सम गोष्टींचा प्रादुर्भाव होत असल्यास तातडीने कृषी विभागाशी संपर्क साधावा विनोद हेगडे, तालुका कृषी अधिकारी, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:26 17-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow