विद्यार्थ्यांच्या दप्तराला आता शनिवारी सुट्टी; शिक्षण विभागाचा निर्णय

Jun 3, 2024 - 17:57
Jun 3, 2024 - 17:29
 0
विद्यार्थ्यांच्या दप्तराला आता शनिवारी सुट्टी; शिक्षण विभागाचा निर्णय

◼️ विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी करण्याचा उद्देश

रत्नागिरी : विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या वर्तन व जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण व्हावी, चांगल्या सवयी, सहकार्य नेतृत्व गुणांचा विकास व्हावा या हेतूने सर्व शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातील प्रत्येक शनिवारी आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. १५ जूनपासून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे.

तर्कसंगत विचार आणि कार्य करण्यासाठी सक्षम असणाऱ्या तसेच करुणा, सहानुभूती साहस, लवचिकता, वैज्ञानिक चिंतन, रचनात्मक, कल्पनाशक्ती, नैतिक मूल्य असणाऱ्या उत्तम मनुष्यत्वाचा विकास हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा महत्वाचा उद्देश आहे. सध्याच्या काळात लहान वयातही विद्यार्थ्यांना ताण तणाव, उदासीनता, नैराश्य या मानसिक विकारांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शालेय जीवनात आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवल्यास विद्यार्थ्यांची शिक्षणाची अभिरूची वाढीस लागेल त्याचा निश्चितच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर चांगला परिणाम होईल. विद्यार्थ्यांची गळती, अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.

दोन दिवस अभ्यासापासून विश्रांती 
आनंददायी शनिवार उपक्रम सुरू झाल्यानंतर शाळांना शनिवारी कोणत्याही विषयाचे वर्ग घेता येणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थी शनिवारी शाळेत आल्यानंतर त्यांची अभ्यासापासून सुटका होणार आहे. शाळेचा संपूर्ण वेळ आनंददायी शनिवारसाठी करायचा आहे. असे स्पष्ट आदेशही शिक्षण विभागाने दिले आहेत. आठवड्यातून दोन दिवस त्यांना अभ्यासापासून विश्रांती भेटल्यानंतर ते सोमवारी शाळेत येतील आणि त्यांच्यातील अभ्यास व शाळेबद्दल गोडी वाढलेली दिसणार आहे.

शनिवारी योग व प्राणायामचे धडे शाळास्तरावर दर शनिवारी विद्यार्थ्यांना प्राणायाम, योग, ध्यानधारणा, श्वसनतंत्र शिकवले जाणार आहे. आपत्ती व्यवस्थापनाची मूलतत्वे व व्यावहारिक प्रशिक्षणाचे धडेही दिले जाणार आहेत. दैनंदिन जीवनातील वित्तीय व्यवस्थापन, आरोग्याचे रक्षण करण्यासाठीच्या उपाययोजना, रस्ते सुरक्षा, समस्या निराकरणाची तंत्रे, कृती खेळ यावर आधारित उपक्रम, नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य मार्गदर्शन केले जाणार आहे.

उपक्रमाचा हेतू...
खेळीमेळीच्या वातावरणातून विद्यार्थ्यांची शिकण्याची तयारी करणे. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक, भावनिक कौशल्ये विकसित करणे, संभाषण कौशल्य आणि नैराश्यावर मात करण्याची क्षमता विकसित करणे, विद्यार्थ्यांना ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यास सक्षम बनवणे. शालेय शिक्षण घेताना विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:19 PM 03/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow