दापोली : उन्हवरेतील कॉजवे मार्ग वाहतुकीस धोकादायक

Aug 21, 2024 - 15:15
 0
दापोली : उन्हवरेतील कॉजवे  मार्ग  वाहतुकीस धोकादायक

गावतळे : संपूर्ण कोकणात गरम पाण्याच्या कुंडासाठी प्रसिद्धः असलेल्या दापोली तालुक्यातील उन्हवरे येथील कॉजवेचा भराव काही दिवसांपूर्वी खचलेला आहे. या मार्गावरून वाहतूक सुरू ठेवणे धोकादायक आहे, मात्र याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे वाहनचालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. गरम पाण्याच्या कुंडाजवळ उन्हवरे गावाहून वावघर गावाला जोडणारा उन्हवरे-वावघर भडवळे रस्ता पुढे खेड तालुक्यातील खाडीपट्टामार्गे खेड शहराकडे जाणारा वाहतुकीच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा मार्ग आहे. या मार्गावर दापोली तालुक्यातील उन्हवरे येथील गरम पाण्याचे कुंड तसेच पनहाळेकाजी लेणी त्याचप्रमाणे दाभोळ येथील भुयारातील श्री चंडिका देवस्थान या पर्यटनस्थळांकडे येण्या-जाण्यासाठीही जवळचा मार्ग आहे. या मार्गावर आता फरारे येथे जेटी झाल्यामुळे या दोन्ही भागांतील लोकांना गुहागर तालुक्यात जाण्यासाठीचा सोयीचा मार्ग आहे.

या मार्गावर उन्ह‌वरे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील वावघर या गावातून जाणारा आणि उन्हवरे-वावधर या दोन गावांना जोडणाऱ्या उन्हवरे वावघर खाडीवरील काजवेचा भराव खचल्यामुळे या मार्गावरील वाहतूक धोक्याची झाली आहे. 

हा मार्ग दळणवळणाच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचा मार्ग असून, या कॉजवेची सुधारणा होऊन येथे कॉजवेऐवजी नव्याने पुलाचे बांधकाम होणे गरजेचे आहे. नाहीतर दर पावसाळ्यात येणाऱ्या पुराच्या पाण्याच्या लोढ्याने दरवेळी कॉजवेचा भराव खचतो. या कॉजवेचे गाळे लहान आहेत. पुराच्या पाण्यासोबत वाहून आलेल्या झाडांचा कचरा अडकून बसल्यामुळे गाळ्यातून धड पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे पावसाळ्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली तरीही कॉजवेवरून पाणी वाहू लागते. त्यामुळे अनेकदा हा मार्ग वाहतुकीस बंद करावा लागतो.

ही परिस्थिती बदलण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ही महत्त्वाची समस्या कायमची निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

खेडकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग
उन्हवरे या गावाकडून वावधर, भडवळे या दापोली तालुक्यातील गावांकडून खेड तालुक्यातील पन्हाळजे, होडकाड, बहीरवली, तुंबाड, मूळगाव सवणस, कर्जी, मुंबके, कोरेगाव, नांदगाव, खारी, सुसेरीमार्गे खेड शहराकडे जाणारा वाहतुकीच्यादृष्टीने महत्त्वाचा असा मार्ग जातो. हा मार्ग दापोली तालुक्यातील पांगारी, दाभिळ, शिरवणे, पन्हाळेकाजी आदी गाव परिसरातील रहिवाशांना खाडीपट्टामार्गे खेड तालुक्याकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:42 PM 21/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow