संगमेश्वर : रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

Aug 22, 2024 - 10:43
 0
संगमेश्वर : रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

संगमेश्वर : तालुक्यातील पाचांबे नेरदवाडी येथील संतोष महादेव सावंत (४६) हे चार दिवसापूर्वी शेतात कुंपण घालण्यासाठी गेले असता अचानक रानडुकराने हल्ला केल्याने त्यात सावंत हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असून आता त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

जखमी संतोष सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या घरानजीक असलेल्या शेतात रानटी प्राणी येऊन शेताची नासधूस करत असल्याने ते १६ ऑगस्ट रोजी सकाळी शेताला कुंपण घालण्यासाठी गेले होते. कुंपण घालत असता दुपारी १ च्या सुमारास अचानक समोरून येत रानडुकराने त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यात संतोष यांच्या डाव्या पायाच्या मांडीमध्ये डुकराचा सुळा घुसल्यावर त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरु केला, मात्र डुकराने परत हल्ला चढवला.

यानंतर डुकराने पळ काढला. या हल्ल्यात संतोष यांच्या उजव्या बाजूला मुका मार लागला तर उजव्या बगलेत मोठी जखम झाली. संतोष हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. ते मदतीसाठी ओरडत होते, त्यावेळेस रस्त्याने जाणारे दत्ताराम झोरे यांनी त्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकल्याने त्यांनी जाऊन पहिले असता सावंत हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. त्यांनी इतर ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना त्यांच्या राहत्या घरी नेण्यात आले.

संतोष यांना ग्रामस्थानी तत्काळ १०८ या रुग्णवाहिकेला कॉल करुन बोलावून त्यांना संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर तेथील वैद्यकीय अधिकारी मोरे यांनी उपचार केले. यात त्यांच्या उजव्या मांडीला ९ तर उजव्या बगलेत ५ टाके घालण्यात आले. याची खबर वनविभागाला कळताच संगमेश्वर- देवरुख विभागाचे वनपाल मुल्ला यांनी रुग्णालयात जाऊन संतोष यांची विचारपूस करुन तसा पंचनामा करुन वरिष्ठाना अहवाल पाठवला आहे. संतोष सावंत हे डुकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याची खबर मिळताच तालुक्याचे आमदार शेखर निकम, माजी आमदार सुभाष बने, जि.प. माजी अध्यक्ष रोहन बने, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष बारक्या बने, राजेंद्र पोमेंडकर, संदेश कुवळेकर आदींनी ग्रामीण रुग्णालयात जात वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेत संतोष यांच्या तब्येतीची चौकशी केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 22-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow