संगमेश्वरात मुसळधार पावसामुळे नुकसान

Jul 27, 2024 - 12:02
 0
संगमेश्वरात  मुसळधार पावसामुळे नुकसान

संगमेश्वर : तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस कोसळत असून, अनेक ठिकाणी पडझड झाली होती. आंबेड-डिंगणी मुख्य रस्त्यावरील असुर्डे येथे रस्त्यावर झाड पडल्याने करजुवे, डिंगणी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच माभळे गावातील रस्त्याला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत.

मुख्य रस्त्यावरून संदेश कापडी यांच्या घराकडून अंतर्गत आलेला रस्ता लहान वाहनांसाठी उपयुक्त ठरला. या अंतर्गत रस्त्याची पार दुर्दशा झाली आहे. संदेश कापडी यांनी दुरुस्तीअभावी दुर्दशा झालेल्या रस्त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याचे लक्षात घेऊन चार दिवसांपूर्वीच स्वखर्चाने त्या रस्त्याची दुरुस्ती केली होती. त्यामुळे हा रस्ता दुचाकी, रिक्षा तसेच लहान चारचाकी वाहनाना वाहतुकीसाठी उपयोगी ठरला. अन्यथा मोठ्या वाहनांसह लहान वाहनांही मार्ग खुला होईपर्यंत अडकून राहावे लागले असते.

संगमेश्वर तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गवरील माभळे गावातील रस्त्याला मोठ्या प्रमाणात भेगा पडले आहेत त्यामुळे पुढील गावासाठी या रस्त्यावरून होणाऱ्या वाहतुकीला धोका असून दिवसभरात भेगा वाढत असून त्या रुंदावल्या जात असल्याने भूस्खलन होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा रस्ता पूर्ण चढ उताराचा असून डोंगर भागातून गेला आहे. रस्त्याला तडे गेल्याने माभळे गवळवाडी, उजगाव गवळवाडी, पिंगळेवाडी, बडदवाडी, नांदळज घनगरवाडी आदी पुढील गावासाठी हा रस्ता वाहन वर्दळीसाठी धोकादायक झाला आहे. परंतु भेगा वाढत जाऊन भूस्खलन झाल्यास मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

संगमेश्वर तालुका ३२ तास अंधारात
सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे बुधवारपासून संगमेश्वर तालुका सलग ३२ तास अंधारात होता. वीज पुरवठा नेमका कधीपर्यंत सुरळीत होईल, याबद्दल जनतेला साधी माहिती देण्याचे सौजन्य महावितरणने दाखवले नाही. त्यामुळे ग्राहक संतप्त झाले आहेत. तहसीलदार, जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि राज्यकर्ते यांनी संगमेश्वर महावितरण कंपनीला याबद्दल समज द्यावी. अन्यथा जनता रस्त्यावर उतरली तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो याची नोंद घ्यावी, असा इशारा वीज ग्राहकांनी दिला आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 PM 27/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow