Ratnagiri Crime : पिडीत युवतीने दिलेल्या माहितीत विसंगती; दोन दिवसात नेमके प्रकरण उघड होणार ?

Aug 29, 2024 - 12:51
 0
Ratnagiri Crime : पिडीत युवतीने दिलेल्या माहितीत विसंगती; दोन दिवसात नेमके प्रकरण उघड होणार ?

रत्नागिरी : नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी पोलिसांनी आणखी दोन संशयित चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत. दोन दिवसांत नेमके हे प्रकरण काय ते उघड होईल, असा दावा पोलिस सूत्रांनी केला आहे; मात्र पीडित मुलीने दिलेला जबाब आणि वस्तुस्थितीमध्ये काहीशी विसंगती आढळून येत असल्याने पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

लैंगिक अत्याचाराचा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने रत्नागिरीकर सुन्न झाले. संवेदना असलेले रत्नागिरीकर या हीन प्रकरणाच्या विरोधात संताप व्यक्त करत रस्त्यावर उतरले. या जनप्रक्षोभाला पोलिसांना तोंड द्यावे लागले. ‘संशयिताला आमच्या ताब्यात द्या, त्याला फाशी द्या,’ अशी मागणी करत सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी जिल्हा रुग्णालयात धडकले. या जनप्रक्षोभामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. संतप्त जमावाला आवरताना पोलिस दलाला नाकीनऊ आले. जमावाने अनेकदा ‘रास्ता रोको’ करण्याचा प्रयत्न केला. तपास करण्यासाठी दोन-तीन दिवसतरी द्या, अशी विनंती जमावाला करण्याची वेळ पोलिसदलावर आली.पोलिसांनी त्यानुसार तपासाला गती दिली आहे. तरुणीने दिलेल्या जबाबानुसार, पोलिस प्रत्येक मुद्द्याची उकल करत आहेत. काही महत्त्वाची माहिती हाती लागली असून त्या अनुषंगाने तिघा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. बुधवारी या प्रकरणामध्ये आणखी प्रगती झाली आहे.

बुधवारी पोलिसांनी आणखी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दोन दिवसांत या प्रकरणाचा उलगडा होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला; परंतु पीडितेचा जबाब आणि वस्तुस्थिती यामध्ये काहीशी विसंगती आढळत असल्याने पोलिस दुसऱ्या बाजूनेही या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:15 29-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow