सेलफोन म्हणजे करिअरला लागलेला 'कॅन्सर' : डॉ. श्याम जोशी

Aug 29, 2024 - 13:59
Aug 29, 2024 - 14:21
 0
सेलफोन म्हणजे करिअरला लागलेला 'कॅन्सर' : डॉ. श्याम जोशी

माखजन : विद्यार्थ्यांनी दिशाहीन शिकत राहण्यापेक्षा, कौशल्ये आत्मसात करायला हवीत. सेलफोन हा करिअरला लागलेला कॅन्सर आहे. आपण सेलफोनच्या प्रमाणापेक्षा जास्त आहारी गेलो आहोत. यावर आजच्या पिढीने जरूर विचार करा, असे प्रतिपादन डीबीजे कॉलेजचे प्राचार्य डॉ. श्याम जोशी यांनी केले. ते माखजन इंग्लिश स्कूल येथे 'शिकायला शिका' या विषयावर बोलत होते. यावेळी इ. ९ वी व ११ वी च्या विद्याथ्यर्थ्यांना व त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले.

ते पुढे म्हणाले, कोणतेही लिखाण हा अनमोल ठेवा आहे. प्रत्येक गोष्टीच्या नोंदी ठेवायला शिका याचा उपयोग आजच होईल असे नाही, त्याचा उपयोग अनेक वर्षे उलटल्यावर होऊ शकतो. लिखाण हे आनंदाच्या बँकेतील शिधा आहे. इतिहासातील अनेक बाबी नोंदी नसल्यामुळे जशाच्या तशा कळण्यात अडचणी येतात. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारणे, समजून घेणे, प्रदर्शित करणे, प्रश्न सोडवणे, विचार करणे, माहिती गोळा करणे, माहितीचा सुयोग्य वापर करणे, लिहिणे, शिकवणे, वाचणे, संक्षेपित करणे, निर्माण करणे, ऐकणे आदी कौशल्ये आत्मसात करायला हवे, असे नमूद केले.

विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी वाचन करताना प्रत्येक शब्दाचा उच्चार सुयोग्य करावा, कारण एकदा चुकीचं वाचलं की समोरच्याला चुकीचेच शिकवलं जातं. विद्यार्थ्यांनीच रोजनिशी लिहायला हवं. विद्यार्थ्यांना कोणत्याही संख्येचा पाढा म्हणता आला पाहिजे यासाठी निर्माणाची शक्ती प्रत्येकाने आत्मसात करायला हवी. शिकता शिकता विद्यार्थ्यांनी दुसऱ्याला शिकवलं पाहिजे, यामुळे स्वतः समृद्ध व्हाल असे नमूद केले. शिकवण्यापूर्वी शिक्षकांना प्रत्येक गोष्ट समजली पाहीजे आणि ती योग्य भाषेत समोरच्याला समजावता आली पाहिजे तरच अध्ययन अध्यापन प्रक्रिया समृद्ध होईल. प्रत्येकाला योग्य प्रकारे व्यक्त होता आले पाहिजे.

शिवाय संकलित माहितीचे सुयोग्य उपयोजन करता यायला हवं असे नमूद केले. मी आनंदी होण्यासाठी शिकतो आहे हा विचार डोळ्यासमोर ठेऊन शिका, असे आवाहन केले. 
कार्यक्रमापूर्वी प्रशालेच्या मुख्याध्यापिका रुही पाटणकर यांनी डॉ. श्याम जोशी यांचे पुष्प देऊन स्वागत केले. या कार्यक्रमाला प्रा. गौस मुल्ला, प्रा. अभिजित सुर्वे, ओंकार मुळ्ये, सचिन साठे, अक्षय राजवाडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार गौरव पोंक्षे यांनी मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:27 PM 29/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow