देवरूख येथील शाळा क्र. ३ कडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था

Aug 29, 2024 - 14:33
 0
देवरूख येथील शाळा क्र. ३ कडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था

साडवली : संगमेश्वर तालुक्यातील महत्वाचे ठिकाण असलेल्या देवरूख येथील शाळा क्र. ३ या शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे पालकांमधून नाराजी व्यक्त केली जात असून, हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करा, अशी मागणी केली जात आहे.

देवरूख येथील शाळा क्र. ३ ही नावाजलेली शाळा असून, त्या शाळेचा पट अडीचशे ते तीनशेच्या आसपास आहे. सावरकर चौकातील नाक्यातून रस्ता सोडून पुढे जाताना सर्व रस्ता कच्चा आहे. या रस्त्याला खड्डे पडले असून त्या खड्यात लाल पाणी साचलेले असते. शाळेत मुले जाताना बाजूने गाडी गेल्यास खड्यातील पाणी मुलांच्या कपडयावर उड़ते आणि तेच कपडे घालून त्या मुलांना शाळेत बसावं लागते. देवरूख ग्रामीण रुग्णालयाकडे जाण्यासाठी हाच रस्ता वापरतात तसेच कृषी मंडल कार्यालयातही याच रस्त्याने जावे लागते. महत्त्वाचा रस्ता असूनही या रस्त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या रस्त्याला कोणी वाली नाही का? असा प्रश्न सामान्य जनतेमधून उपस्थित केला जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:01 PM 29/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow