रविंद्र चव्हाणांमुळेच राणे विजयपथावर..

Jun 5, 2024 - 09:35
 0
रविंद्र चव्हाणांमुळेच राणे विजयपथावर..

रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांनी मिळवलेला विजय जितका भाजपाच्या कोकणातील वाढलेल्या ताकदीचा आहे त्याहून अधिक पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संघटन कौशल्याचा, मुत्सद्देगिरीचा आणि यशस्वीपणे मांडलेल्या राजकीय समीकरणांचा आहे. मंत्री चव्हाण यांच्यासारखा चाणाक्ष आणि मुरब्बी राजकारणी नेता राणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्यानेच १५ वर्षांनंतर राणे कुटुंबियांना लोकसभेचा विजयपथ दिसला हे निर्विवाद सत्य आहे. 

१९७७ च्या आणीबाणी नंतर झालेल्या निवडणुकीत जनसंघाच्या बाबासाहेब परुळेकरांनी काँग्रेसच्या शांताराम पेजे यांचा २५३०० मतांनी पराभव केला होता. त्यानंतर प्रथमच भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर आज ४७ वर्षांनी नारायण राणे यांनी विजय प्राप्त करून जवळपास पाच दशकांनी इतिहासाची पुनरावृत्ती केली. नारायण राणे यांच्या सारखा ताकदवान उमेदवार जरी भाजपाने दिलेला असला तरी विद्यमान खासदार विनायक राऊत यांचे मतदारसंघात घरोघरी वैयक्तिक संबंध होते. त्यातच रत्नागिरी हा शिवसेनेला मानणाऱ्या मतदारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तिथे भाजपाचे अस्तित्व मर्यादित. त्यामानाने सिंधुदुर्गातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या तिन्ही ठिकाणी भाजपाने रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून बरीच विकासकामे आणि जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून निधी वाटप केलेले असल्याने शिवसेनेचे आव्हान नव्हतेच. 

रत्नागिरीत मात्र सुरुवातीला भाजपाला अनुकूल परिस्थिती नव्हती. जिल्ह्यात भाजपाची संघटना अजून म्हणावी तशी बळकट नाही, मुस्लिम मतदारांची लक्षणीय संख्या, एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेची शेवटच्या क्षणापर्यंत संदिग्ध वाटावी अशी तळ्यात मळ्यात घेतलेली भूमिका अशा अनेक आव्हानांना नारायण राणे यांना सामोरे जावे लागले. 

मात्र पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या रूपाने निवडणूक नियोजनात नेहेमीच पैकीच्या पैकी गुण प्राप्त करणाऱ्या अनुभवी व्यक्तीने या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतल्याने नारायण राणे यांनी बाजी आधीच जिंकल्याचे दिसू लागले होते. रविंद्र चव्हाण हे स्वतः डोंबिवली विधानसभा मतदार संघातून सलग तीन वेळा विक्रमी मताधिक्याने निवडून येत आहेत त्याच बरोबर चव्हाण हे निवडणूक नियोजन व व्यवस्थापन, राजकीय  डावपेच आणि इतकेच नव्हे तर मतदारांची दुखरी नस ओळखण्यात अत्यंत तरबेज आहेत. कोकणातली कौटुंबिक पार्श्वभूमी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने विरोधी मतांची गणितं आणि त्यांच्या मर्यादा त्यांना तोंडपाठ आहेत. लोकांमध्ये वावरताना स्वतःच्या मंत्रिपदाचा लवलेशही सोबत न बाळगणारा आणि मातीशी नाळ जुळलेला राजकारणी अशी त्यांची ओळख भाजपाला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विजयाचा मार्ग देणारी ठरली.  

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:02 05-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow