Maharashtra Weather Update : कोकणाला मुसळधार पावसाचा इशारा

Sep 6, 2024 - 11:33
 0
Maharashtra Weather Update : कोकणाला मुसळधार पावसाचा इशारा

पुणे : राज्याच्या काही भागात पावसाचा जोर वाढला (Rain Update) आहे, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेलं पीकांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं चित्र आहे.

अशातच आज देखील राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकणासह काही भागात मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रात देखील घाट माथा परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे, नागरिकांना या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात देखील आज जोरदार पावसाची शक्यता (Heavy Rain)आहे. राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह आणि विजांची कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आज कोणत्या भागात पावासाची शक्यता?

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता (Rain Alert) वर्तवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड परभणी, लातूर, धाराशिव या जिल्ह्याचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

विदर्भातील, अकोला, अमरावती, नागपूर, बुलढाणा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसह उपनगरातही आज पावसाची शक्यता आहे. पुणे आणि ठाण्यासह संपूर्ण कोकणाला आज पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. नवी मुंबई आणि उर्वरित भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

पुण्यासह काही जिल्ह्यांत 9 सप्टेंबरपर्यंत पावसाची शक्यता

राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने विश्रांती घेतली आहे. आता मध्य महाराष्ट्रातील पुणे तर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये 9 सप्टेंबरपर्यंत मध्यम पावसाचा (Rain Update) अंदाजहवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे.

राज्यभरात 2 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस कोसळला. मराठवाड्यात शेतीतील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्याचबरोबर अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर मात्र या भागातला पाऊस काही प्रमाणात कमी झाला आहे. सध्या कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही भागात पाऊस सुरू आहे. मात्र विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत 9 सप्टेंबरपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 06-09-2024

 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow