निसर्ग हीच कोकणची खरी श्रीमंती : सयाजी शिंदे

Sep 6, 2024 - 14:08
 0
निसर्ग हीच कोकणची  खरी श्रीमंती : सयाजी शिंदे

चिपळूण : कोकणचा निसर्ग, येथील जैवविविधता, शुद्ध हवा, पाणी, नद्या, सह्याद्रीचे कडे हीच खरी श्रीमंती आहे. हा निसर्ग कोकणवासीयांनी जपला पाहिजे आणि त्यामध्ये भर घालायला हवी. त्यासाठी वृक्षारोपण चळवळ राबविणे गरजेचे असल्याचे मत ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले. निरव्हाळ प्राथमिक शाळेत आयोजित सत्कार सोहळ्यात अभिनेते शिंदे बोलत होते. यावेळी ग्रामस्थांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

अभिनेते सयाजी शिंदे दोन दिवस चिपळूण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी निरव्हाळ येथील अरण्यवाट या प्रकल्पाला भेट दिली. यानंतर त्यांचा ग्रामस्थांतर्फे सत्कार आयोजित करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ लेखक रंगनाथ पठारे, लेखिका सुमती लांडे व त्यांचे सहकारी होते. यावेळी माजी सरपंच मधुकर सावंत, संतोष वाघे, मुंबई ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अनंत सावंत, देवस्थानचे अध्यक्ष दत्ताराम सावंत, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष अमित वाघे, दिनेश सावंत, राजू जाधव, सागर जाधव, महेंद्र इंदुलकर, मल्हार इंदुलकर, सुषमा गांधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले, कोकणच्या निसर्गाची मला भुरळ पडते. त्यामुळे आपण कायम इथे येत असतो. येथील माणसेसुद्धा प्रेमळ आहेत. कोकणला निसर्गाचे देणे लाभलेले आहे. त्याची जपणूक आपण करायला हवी. स्थानिक जमिनीमध्ये होणारी विविध झाडे, रोपे यांचे संवर्धन करायला हवे. त्यामध्ये विद्यार्थ्यांचा पुढाकार हवा. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा बिया गोळा कराव्यात आणि त्या एकत्र केल्यानंतर त्यांची रोपे तयार करावीत. तसेच त्या रोपांची माहिती घ्यावी आणि भविष्यात या रोपांची लागवड ठिकठिकाणी व्हावी. आपण पुढच्यावेळी इथे पुन्हा येऊ त्यावेळी अशाप्रकारे बियांचा संग्रह विद्यार्थ्यांनी केला असेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आणि यावेळी विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाविषयी शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक शशिकांत सकपाळ यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:34 PM 06/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow