राजापूर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा : अजित यशवंतराव

Sep 9, 2024 - 12:33
 0
राजापूर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा : अजित यशवंतराव

राजापूर : मागील पंधरा वर्षात स्थानिक नेतृत्व नसल्यामुळेच राजापूर लांजा साखरपा या विधानसभा मतदारसंघाचा विकास होऊ शकला नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून स्थानिकच उमेदवार असावा. शिवाय महायुतीकडून हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा, यासाठी पक्षाकडे मागणी करण्यात आली असून, त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव यांनी राजापूर येथे पत्रकार परिषदेत दिली. महायुतीकडून आपण इच्छुक असून, ती संधी आपणाला मिळेल, असा विश्वास यांनी व्यक्त केला, दरम्यान, या मतदारसंघात अपेक्षित गोष्टी डावलून राजकारण सुरू असून, निधीचा पडत असलेला पाऊस हा तालुक्याच्या समस्या निवारण्यासाठी कमी तर पक्ष कार्यकर्ते आणि ठेकेदार यांचे हित जोपासण्यासाठी जास्त आहे. असा जोरदार आरोप राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव यांनी पत्रकार परिषदेत केला.

विधानसभेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. पार्श्वभूमीवर राजापूर, लांजा, साखरपा या विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. एकीकडे महाविकास आघाडी तर दुसरीकडे महायुती यांच्यातच संभाव्य उमेदवारीवरून जोरदार स्पर्धा सुरू आहे. महायुतीमध्ये शिवसेनेकडून (शिंदे गट) सिंधू रत्न समितीचे सदस्य आणि जिल्हा पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी उमेदवारीसाठी जोरदार आघाडी उघडली असतानाच दुसरीकडे भाजपकडूनदेखील वा विधानसभा मतदारसंघावर जोरदार दावा ठोकण्यात आलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने देखील या वादात उडी घेत विधानसभा मतदारसंघावर हक्क ठोकला आहे.

राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस अजित यशवंतराव यांनी राजापुरात पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीबाबत भाष्य केले, मागील पंधरा वर्षात राजापूर, लांजा, साखरपा या विधानसभा मतदारसंघाचा अपेक्षित विकास होऊ शकला नाही. यामध्ये प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यांच्या भीषण स्थितीमुळे हा मतदारसंघ खूपच मागे गेला, असा त्यांनी ठपका ठेवला.

या विधानसभा मतदारसंघाला स्थानिक नेतृत्व नसल्यानेच ही अवस्था झाल्याची टीका करीत त्यांनी विधानसभा निवडणुकीत स्थानिकच उमेदवार असावा, यावर त्यांनी प्रभावीपणे भर दिला महायुतीमधून स्थानिक उमेदवार म्हणून या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी आपण इच्छुक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राजापूर शहराला भेडसावणाऱ्या पूर रेषेचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. या प्रश्नाची तड लावण्यासाठी पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते; मात्र अद्यापही त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. हे त्यांनी पत्रकार परिषदेत निदर्शनाला आणून दिले. राजापूर, लांजा, साखरपा या विधानसभा मतदारसंघाला स्थानिक आणि सक्षम लोकप्रतिनिधी मिळाला पाहिजे, असा त्याने पुनरुच्चार केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:01 PM 9/9/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow