महाराणी येसूबाई यांचे श्रृंगारपुरात स्फूर्तिस्थळ व्हावे; साताऱ्याच्या राजेशिर्के यांचे रत्नागिरीत उपोषण

Sep 10, 2024 - 10:23
 0
महाराणी येसूबाई यांचे श्रृंगारपुरात स्फूर्तिस्थळ व्हावे; साताऱ्याच्या राजेशिर्के यांचे रत्नागिरीत उपोषण

रत्नागिरी : छत्रपती धर्मवीर संभाजीराजे यांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांचे माहेर असलेल्या श्रृंगारपूर (ता. संगमेश्वर) येथे भव्यदिव्य स्फूर्तिस्थळ व्हावे, या मागणीसाठी साताऱ्याचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केले आहे. त्यांच्यासोबत श्रृंगारपूरचे सरपंच विनोद पवार व सहकारी उपस्थित आहेत.

स्वराज्यासाठी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली अठरापगड जातीच्या लोकांनी आपल्या जिवाचे रान केले. त्यातील राजेशिर्के व इतरही अनेक घराण्यांशी खुद्द छत्रपती शिवरायांची सोयरिक होती. यापैकीच एक राजेशिर्के घराण्यातील लोकांनी तन-मन-धन अर्पण केले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पट्टराणी कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर स्वराज्य संकटात असताना अत्यंत धीरोदात्तपणे संकटाचा सामना केला. छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराजांचे रक्षण केले. २९ वर्ष त्या मुघल बादशाह औरंगजेबाच्या नजर कैदेत होत्या. बंदिवासातही त्यांनी शाहू महाराजांवर उत्तम संस्कार केले आणि कर्तृत्ववान राजा घडवला; मात्र येसूबाईंचे हे कर्तृत्व इतिहासाच्या पानांमध्ये झाकोळल्यासारखे आहे, असे सुहास राजेशिर्के यांनी सांगितले.

साताऱ्यातील इतिहास संशोधकांनी येसूबाईंचे समाधिस्थळ शोधून काढले आहे. त्याच्या संवर्धनासाठीचा पाठपुरावा करत आहोत. येसूबाई यांचे माहेर असलेले श्रृंगारपूर हे गावदेखील अजूनही दुर्लक्षित आहे. या गावात त्यांच्या पितृकुल राजेशिर्के घराण्याचा मोठा वाडा येथे होता, सरंजाम होता;परंतु या घडीला त्याचे भग्नावशेष झाले आहेत. विस्मृतीत गेलेल्या श्रृंगारपूर या गावी त्यांचे साजेसे स्फूर्तिस्थळ उभे राहावे असे राजेशिर्के यांनी सांगितले.

श्रृंगारपूरच्या वाड्यातच महाराणी येसूबाईंचे बालपण सरले. याच ठिकाणी अनेकवेळा छत्रपती संभाजी महाराजांचे वास्तव्य होते आणि याच भागातील एका वाड्यात त्यांना अटक झाली. एवढा मोठा ऐतिहासिक वारसा या पटलावरून दुर्लक्षित झाला आहे. या ठिकाणी येसूबाईंचे स्फूर्तिस्थळ होणे गरजेचे आहे. -सुहास राजेशिर्के 

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 AM 9/10/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow