रत्नागिरी : जिल्ह्यातील पर्ससीन मासेमारी अडचणीत

Sep 10, 2024 - 15:08
 0
रत्नागिरी : जिल्ह्यातील पर्ससीन मासेमारी अडचणीत

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील पर्ससीन नेट मासेमारीला राज्याच्या समुद्र क्षेत्रात मासेमारी करण्यासाठी एकही परवाना दिलेला नाही, त्यामुळे अनेक नौकामालकांची कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक धोक्यात आली आहे. नौकामालक यामुळे अस्वस्थ झाले असून, पर्ससीन नेट नौका विकण्याचा सपाटा सुरू झाला आहे. काही पर्ससीन नेट नौका राज्याच्या समुद्र क्षेत्राबाहेर म्हणजे १२ नॉटिकल मैलांच्या पुढे खोल समुद्रात मासेमारीसाठी जात आहेत. यामुळे नौकामालकांचा आर्थिक खर्च वाढला आहे.

पर्ससीन नेट मासेमारी १ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. राज्याच्या समुद्र क्षेत्रात मासेमारी करण्यासाठी या नौकाना सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाकडून मासेमारी नौका नूतनीकरण परवाना, बंदर परवाना दिला जातो. परंतु, चालू हंगामात सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाकडून कोणताही परवाना दिला गेलेला नाही.

राज्यातील मासेमारी धोरणाचा सोमवंशी अहवालानुसार रत्नागिरी जिल्ह्याच्या १६७ कि.मी. समुद्र क्षेत्रात १८३ पर्ससीन नेट नौका ठेवण्याचे सूचित करण्यात आले. अहवालातील इतर सूचनांनुसार फेब्रुवारी २०१६ साली राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार पर्ससीन नेट मासेमारी आठ महिन्यांवरून चार महिन्यांवर आणण्यात आली. शासनाने आता तर नौका नूतनीकरण परवाने देण्याबाबत सूचना केलेल्या नाहीत. त्यामुळे एकाही पर्ससीन नौकेला सहायक मत्स्य व्यवसाय विभागाकडून कोणताही परवाना देण्यात आलेला नाही.

जिल्ह्यात ४७४ पर्ससीन नौका होत्या. खर्चाच्या तुलनेत मासे न मिळणे, समुद्रातील वातावरणाची अनिश्चितता अशा विविध कारणांमुळे पर्ससीन नेट नौका कमी होत गेल्या. गेल्या वर्षी या नौकांची संख्या २८० पर्यंत आली होती. शासनाच्या सूचनेनुसार १८३ नौकांनाच परवाने देण्याची तयारी सुरू होती; परंतु या संदर्भात परवाना नूतनीकरणाबाबत कोणतेही निर्देश न आल्याने एकाही नौकेला राज्याच्या सागरी क्षेत्रात मासेमारी करण्याची परवानगी नाही. त्यामुळे अनेक पर्ससीन नेट नौका विकल्या जात आहेत. अनेक नौका बंदरातच उभ्या ठेवण्यात आल्या असून, काही नौका राज्याच्या समुद्र क्षेत्राबाहेर म्हणजेच केंद्राच्या अधिकार क्षेत्रातील समुद्रात मासेमारीसाठी जात आहेत. हे अंतर मोठे असल्याने नौकेचा इंधन व इतर खर्च वाढतो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:34 PM 9/10/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow