Maharashtra Weather Update: राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज

Sep 11, 2024 - 09:54
 0
Maharashtra Weather Update: राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज

पुणे : राज्याच्या अनेक भागात पावसाने विश्रांती घेतली आहे, तर अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे, आज हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

आज कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

राज्यात आज (बुधवार) पर्यंतच पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. उद्या (गुरुवार) पासून राज्यात पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. सध्या 15 ते 16 सप्टेंबरपर्यंत खंड पडणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर राज्यात काही ठिकाणी रिमझिम पावासाची शक्यता आहे. त्यानंतर 27पासून पुन्हा मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता आहे.

गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचा विसर्गात मोठी वाढ

गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्यानं मुसळधार पाऊस (Heavy Rain) होत आहे. परिणामी, धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्यानं धरण प्रशासनानं धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गात मोठी वाढ केली आहे. धरणाचे सर्व 33 दरवाजे कालपासून उघडण्यात आले असून आज सकाळपासून धरणाचे सात दरवाजे दोन मीटरनी तर, 26 दरवाजे दीड मीटरनी सुरू करण्यात आले आहे. सध्या धरणातून 3 लाख 93 हजार 619 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सातत्यानं पाऊस सुरू राहिल्यास पाण्याच्या विसर्गात आणखी मोठी वाढवण्याची शक्यता असल्यानं नदीकाठावरील गावातील नागरिकांनी सतर्क रहावं, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

गोंदिया जिल्ह्यात पावसाने घेतली विश्रांती

गोंदिया जिल्ह्यात काल मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं होतं अनेक भागाला पुराचा फटका बसला होता. नदी नाले हे तुडुंब भरून वाहत होते. अनेक मार्ग बंद करण्यात आले होते .परंतु आता काल रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतली असून जिल्ह्यातील परिस्थिती आता हळूहळू पूर्व पदावर यायला सुरुवात झाली आहे. अशातच नदी आणि नाल्याच्या बाजूला असणाऱ्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे आता या शेतीचे पंचनामे लवकरात लवकर महसूल विभाग आणि कृषी विभाग करतील असे अपेक्षा आता नागरिक करत आहेत.

भंडाऱ्यात मुसळधार पावसाच्या नदीपत्राच्या प्रवाहात क्रेन गेली वाहून

भंडारा जिल्ह्यात परवा सायंकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीनाले प्रवाहित झालेले आहे. दरम्यान, भंडारा शहरालगत सुरू असलेल्या बायपासच्या निर्माणाधीन कामावर वैनगंगा नदीच्या कोरंबी परिसरात मोठ्या पुलाची निर्मिती होत आहे. या कामावर असलेली क्रेन मुसळधार पावसामुळं वैनगंगा नदी प्रवाहित झाल्यानं या प्राण्याच्या प्रवाहात भलीमोठी क्रेन वाहून गेल्याचा प्रकार आज सकाळी घडला. ही क्रेन नदीपत्रातून वाहत जात असताना या परिसरात असलेल्या मोठ्या हायटेन्शन वायर तुटल्यात. नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी ठरली असली तरी, क्रेन नदीपत्रातून वाहून जात असल्यानं पुढील गावातील गावकऱ्यांना धोक्याची शक्यता नाकारता येत नाही, यादृष्टीेनं प्रशासनानं आता नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 11-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow