रत्नागिरी : मांडवीतील सोळकोबा, बाळकोबा गणपती

Sep 11, 2024 - 10:02
Sep 11, 2024 - 10:12
 0
रत्नागिरी :  मांडवीतील सोळकोबा, बाळकोबा गणपती

रत्नागिरी : शहरातील मांडवी येथे जवळपास १००हून अधिक वर्षांची परंपरा लाभलेले, नवसाला पावतात अशी ख्याती असलेले आणि ६ फूट उंचीचे, वैशिष्ट्यपूर्ण विसर्जन मिरवणूक असणारे दोन गणपती आहेत. शिवलकर कुटुंबीयांकडे सोळकोबा आणि बाळकोबा हे गणपती प्रसिद्ध आहेत. या गणपतींच्या दर्शनासाठी शेकडो भाविक येत आहेत.

मांडवी येथे गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रतिष्ठापना केले जाणारे गणपती तयार करण्यासाठी दोन महिने लागतात. मांडवीतील शिवलकरांच्या घरी ओटी भरून राहील एवढे हे मोठे गणपती देखणे आहेत. या दोन्ही गणपतींना मोठी परंपरा लाभली आहे. मांडवी येथे शिवलकर बंधूंच्या घरी या गणपतींची प्रतिष्ठापना केली जाते. सुधाकर शिवलकर यांच्या घरी सोळकोबा आणि रूपेंद्र शिवलकर यांच्याकडे बाळकोबा मूर्ती विराजमान झाली आहे. सोळकोबाची अप्रतिम मूर्ती ऋषिकेश शिंदे व सहकारी यांनी साकारली आहे. तर, बाळकोबाची मूर्ती राजेश शिवलकर यांनी अतिशय देखणी साकारली आहे. या गणपतीची नित्य पूजा टिळक आळीतील जोशी कुटुंबीयांकडे फार पूर्वीपासूनच आहे. पूर्वी (कै.) चिंतूकाका आली पूजेसाठी येत, त्यांच्या निधनानंतर अनेक वयापासून त्यांचे सुपुत्र गिरीश जोशी हे नित्यपूजा, अभिषेक, आरतीसाठी येतात.

विसर्जन मिरवणूक धावतच 
सोळकोबा व बाळकोबा या दोन्ही मूर्ती अवाढव्य आणि वजनदार असतात. या गणपतींचे विसर्जन मांडवीच्या समुद्रात केले जाते. विसर्जनासाठी शिवलकर कुटुंबीय, भाविक आगळी पद्धत वापरतात. दोन्ही मूर्ती मोठ्या आकाराच्या, उंचीच्या असल्याने त्या नेण्यासाठी चाळीस पन्नास लोकांची गरज असते. चाळीस फुटी सागवानी वाशांवर या मूर्ती ठेवल्या जातात. विसर्जनासाठी एकदा मूर्ती उचलल्यानंतर त्या मांडवी समुद्रकिनाऱ्यावर नेईपर्यंत कोठेही खाली ठेवल्या जात नाहीत. त्यानंतर मांडवी किनाऱ्यावर आरती म्हटल्यानंतर प्रार्थना करून समुद्रात नेण्यात येते. हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरतो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 9/11/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow