"जोपर्यंत भाजप आहे, आरक्षणाला कुणीही धक्का लावू शकत नाही" : अमित शहा

Sep 11, 2024 - 12:20
 0
"जोपर्यंत भाजप आहे, आरक्षणाला कुणीही धक्का लावू शकत नाही" : अमित शहा

नवी दिल्ली : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा अमेरिका दौरा चांगलाच चर्चेत आला आहे. राहुल गांधी यांनी आरएसएस नंतर आरक्षण धोरणाबद्दल एक भाष्य केले. त्यानी केलेल्या विधानाचे पडसाद भारताच्या राजकारणात उमटले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही यावर भूमिका मांडत राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढवला आहे.

अमित शाहांची पोस्ट, राहुल गांधींच्या विधानावर काय म्हणाले?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात केलेल्या विधानांबद्दल भाष्य करण्यात आले आहे.

अमित शाह म्हणतात, "देशाविरोधात बोलणे आणि देशाचे तुकडे करणाऱ्या शक्तींसोबत उभे राहणे ही राहुल गांधी आणि काँग्रेसची सवय झाली आहे. मग ते जम्मू काश्मीरमध्ये JNKC च्या देशविरोधी आणि आरक्षण विरोधी अजेंड्याचे समर्थन करणे असो, वा परदेशातील व्यासपीठांवर भारताविरोधात बोलणे. राहुल गांधींनी नेहमी भारताच्या सुरक्षेला आणि भावनांना ठेच पोहोचवली आहे."

राहुल गांधींनी काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा समोर आणला -अमित शाह

अमित शाह पुढे म्हणतात, "भाषा-भाषांमध्ये, प्रांता-प्रांतामध्ये आणि धर्मा-धर्मात भेदभाव निर्माण करण्याबद्दल बोलणे, यातून राहुल गांधी यांचे फूट पाडण्याचेच विचार दिसतात.राहुल गांधींनी देशातून आरक्षण संपवण्याची भाषा करून काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आणण्याचे काम केले आहे. मनातील गोष्टी आणि विचार कोणत्या ना कोणत्या माध्यमातून बाहेर येतच असतात."

"मी राहुल गांधींना सांगू इच्छितो की, जोपर्यंत भाजप आहे, आरक्षणाला कुणीही धक्का लावू शकत नाही आणि देशाच्या एकतेसोबत छेडछाड करू शकत नाही", असे शाह यांनी राहुल गांधी यांच्या आरक्षणाबद्दल केलेल्या विधानावर म्हटले आहे.

राहुल गांधी आरक्षणाबद्दल अमेरिकेत काय बोलले?

अमेरिका दौऱ्यात राहुल गांधी यांनी आरक्षणाबद्दल भूमिका मांडली होती. "योग्य वेळ आल्यावर काँग्रेस आरक्षण संपवण्याबद्दल विचार करेन. जेव्हा देशात सर्वांना समान संधी मिळू लागतील. पण, सध्या भारतात अशी परिस्थिती नाही. जेव्हा तुम्ही आर्थिक आकडे बघता, तेव्हा आदिवासींना १०० रुपयातून १० पैसे मिळत आहेत. दलितांना १०० रुपयातून ५ रुपये मिळतात आणि ओबीसींनाही इतके पैसे मिळतात. भारतातील बिझनेस लिडर्सची जर यादी बघितली, तर मला वाटते टॉप २०० मध्ये एक ओबीसी आहे. खरंतर त्यांची संख्या भारतात ५० टक्के आहे. पण, आम्ही या आजारावर उपचार करत नाहीये", असे राहुल गांधी म्हणालेले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 11-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow