"यावेळी आमचाही आवाज मोठा आहे"; राहुल गांधींनी ओम बिर्लांना सांगितली विरोधकांची ताकद

Jun 26, 2024 - 13:59
 0
"यावेळी आमचाही आवाज मोठा आहे"; राहुल गांधींनी ओम बिर्लांना सांगितली विरोधकांची ताकद

नवी दिल्ली : १८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी बुधवारी आवाजी मतदानाने एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला यांची निवड झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पदासाठी बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडल्यानंतर एनडीएमधील सर्व घटक पक्षांनी त्यांच्या नावाला पाठिंबा दिला.

ओम बिर्ला यांची या पदावर निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांना सभापतींच्या आसनावर नेले. यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले. तसेच यावेळी विरोधी पक्षाचा आवाज गेल्या वेळीच्या तुलनेत जास्त असल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटलं.

ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांना खुर्चीवर बसवण्यात आले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले. १७ व्या लोकसभेत घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करून पंतप्रधान मोदी यांनी तुमचा गेल्यावेळचा कार्यकाळ सुवर्णमय होता आणि या वेळीही तुम्ही असेच नेतृत्व करत राहाल अशी आशा आहे, असं म्हटलं. त्यांच्यानंतर, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सभापती ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले आणि संसदेचे कामकाज चालवण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

"तुम्ही दुसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल आणि तुमच्या यशस्वी निवडीबद्दल मी तुमचे अभिनंदन करू इच्छितो. संपूर्ण विरोधी पक्ष आणि भारत आघाडीच्या वतीने मी तुमचे अभिनंदन करू इच्छितो. हे सभागृह भारतातील लोकांच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करते आणि तुम्ही त्या आवाजाचे अंतिम पंच आहात. सरकारकडे राजकीय ताकद आहे, पण विरोधकांकडेही भारताचा आवाज आहे. मागील निवडणुकीपेक्षा यावेळी विरोधकांची ताकद जास्त आहे. सभागृह चालवण्यात आम्ही तुम्हाला सहकार्य करावे अशी विरोधकांची इच्छा आहे. विरोधी पक्ष तुमच्या कामात मदत करू इच्छितात. सभागृहाचे कामकाज वारंवार आणि चांगले व्हावे अशी आमची इच्छा आहे. विश्वासाच्या आधारावर सहकार्य घडणे खूप महत्त्वाचे आहे. विरोधी पक्षाचा आवाज या सभागृहात मांडण्याची मुभा असणे अत्यंत महत्त्वाचे आहे," असं राहुल गांधी म्हणाले.

"सभागृह कसे चालते हे महत्त्वाचे नाही. देशाचा आवाज कसा बुलंद होतोय हे महत्त्वाचे आहे. या निवडणुकीने हे दाखवून दिले आहे की, भारतातील जनतेला संविधानाचे रक्षण करायचे आहे. विरोधकांना तुमच्या बाजूने बोलण्याची संधी देऊन संविधानाचे रक्षण केले जाईल, याची आम्हाला खात्री आहे," असेही राहुल गांधी म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:28 26-06-2024

 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow