रत्नागिरी : जिल्ह्यात गणेशोत्सवात सरींचा पाऊस

Sep 12, 2024 - 10:23
 0
रत्नागिरी :  जिल्ह्यात गणेशोत्सवात सरींचा पाऊस

रत्नागिरी : गणेशोत्सवात जिल्ह्यात सरींचा पाऊस सुरू आहे. अचानक कोसळणाऱ्या सरींनी नागरिकांची तारांबळ उडत आहे. हा पाऊस भातशेतीला पूरक असून कीडरोगांचा प्रादुर्भाव टळणार आहे. हवामान विभागाकडूनही तुरळक पावसाची शक्यता वर्तविली असल्यामुळे गुरुवारी (ता. १२) गौरी गणपती विसर्जनावर पावसाचे सावट जिल्ह्यात बुधवारी (ता. ११) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासात सरासरी १३.९८ मिमी पाऊस झाला आहे. त्यात मंडणगड २१.५०, दापोली १६, खेड १९.७१, गुहागर १२.२०, चिपळूण १०.७७, संगमेश्वर १०.५८, रत्नागिरी १४, लांजा ९.६०, राजापूर ११.५० मिमी नोंद झाली आहे. १ जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३९०६ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. पावसाचा जोर सप्टेंबर अखरेपर्यंत राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. गेले आठ दिवस पडत असलेला पाऊस अनियमित असल्यामुळे काही महसूल मंडळात प्रमाणापेक्षा कमी नोंद होत आहे. 

त्याठिकाणची भातशेती उन्हामुळे पिवळी पडू लागली आहे. तसेच पाणी कमी असल्यामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. लांजा, संगमेश्वर या दोन तालुक्यातील शेतकऱ्यांकडून याबाबत कृषि विभागाकडे तक्रारी येत आहेत.

जिल्ह्यात सर्वत्र सरीचा पाऊस सुरू राहिला तरच भात उत्पादन चांगले येईल. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्याच्या सुरवातीला पावसाने विश्रांती घेतल्यामुळे निळे भुंगेरे आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला. कृषि विभागानेही तत्काळ शेताच्या बांधावर जाऊन रोगांवर उपाययोजना सुचविल्या. त्यामुळे वेळीच रोग आटोक्यात राहिले. मोठे नुकसान झालेले नाही. हळवी बियाणे ही कमी दिवसांची असतात. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केलेली भात पुढील काही दिवसात कापणी योग्य होणार आहेत. त्या भात रोपांना आलेल्या लोंब्यांमध्ये दूध भरले आहेत. या कालावधीत मुसळधार पाऊस पडला तर रोप पडण्याची भीती असते. यंदा हळव्या भाताचे क्षेत्र कमी असल्यामुळे त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार नाही. मात्र निमगरवी आणि गरवी बियाण्यांना सरीचा पाऊस उपयुक्त ठरणार आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 AM 9/12/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow